शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

एक नवीन सुरुवात.... ❤️‍🩹🫂

 काही दिवसांपूर्वी मी माझ्याच हाताने माझ्या सगळ्या नोट्स डिलीट करून टाकल्या. त्या क्षणी वाटलं होतं की, हा भूतकाळाचा पसारा आवरून टाकला की मन हलकं होईल. पण झालं उलटंच. शब्द गेले, पण त्यांच्यामागे उभ्या असलेल्या सावल्या तिथेच राहिल्या. कागद रिकामे झाले, पण मनाची घुसमट आणखीनच जास्त दाट झाली. आता लक्षात येतंय की, खरंतर माणूस आठवणींनी नाही तर त्या व्यक्त करता येण्याच्या शक्यतेने जिवंत राहतो. मनातलं बोलता आलं नाही की आत कुठेतरी एक अंधार वाढत जातो. तो अंधार माणसाला गिळून टाकत नाही, तो त्याला हळूहळू स्वतःपासूनच अनोळखी करून टाकतो. मी लिहित होतो ते दुसऱ्यांसाठी नव्हतंच कधी. ते माझ्या श्वासाचं काम करत होतं. प्रत्येक वाक्य म्हणजे छातीवरचा एक दगड बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होता. आता तेच दगड पुन्हा एकदा उचलून छातीवर ठेवलेत, इतकाच फरक आहे. म्हणून आता एक गोष्ट ठरवली आहे. तोचतोच भूतकाळ पुन्हा पुन्हा उकरून काढायचा नाही. त्याच जखमांवर बोट ठेवून रक्ताळत बसायचं नाही. जगात विषय कमी नाहीत. माणसं आहेत, रस्ते आहेत, ऋतू आहेत, झाडं आहेत, गावं आहेत, बाजार आहेत, राजकारण आहे, साहित्य आहे, आणि या सगळ्यांतून वाहत जाणारं आयुष्य आहे. मी त्यांच्याविषयी बोलेन. स्वतःला त्यांच्या वाटेला लावून पाहीन. कदाचित त्यातही माझाच एखादा हरवलेला तुकडा सापडेल. कारण आता मला कळून चुकलं आहे की, मी इथं व्यक्त होणं ही माझ्यासाठी चैनीची गोष्ट नाही, तर ती जगण्यासाठीची अट आहे. जसं अन्नं शरीराला लागतं, तसंच शब्द मनाला लागतात. ते थांबले की आतून कुजायला सुरुवात होते. म्हणून मी लिहीत राहीन. रोज नाही जमलं तरी पुन्हा पुन्हा परत येईन. नव्या विषयांकडे, नव्या विचारांकडे, नव्या अनुभवांकडे. कारण गप्प बसणं आता परवडणार नाही. नाहीतर एक दिवस असा येईल की बाहेरून तर सगळं काही सुरळीत दिसेल, पण माझ्या आतला माणूस मात्र ठार वेडा झालेला असेल.!🎭

#मनात_येईल_ते #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂


बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...