एकटा पडलोय म्हणून आता थांबून जावं, पाय आखडून घ्यावेत आणि या अथांग पसरलेल्या कोलाहलातून स्वतःला बाजूला करून घ्यावं, असं वाटत असतानाच हा भोवताल अचानक माणसांनी ओसंडून वाहू लागला आहे. कसलं हे जगणं आणि कसली ही प्रवासाची सक्ती..! मी माझीच एक एकांताची छोटीशी बेटं तयार करत होतो. तिथे फक्त माझा थकवा आणि माझ्याच निरर्थक अस्तित्वाचा रेंगाळणारा वास होता. पण नाही, या जगाला माणसांचे सुटे तुकडे करून शांत बसू द्यायचं नसतं. रेल्वेच्या जनरल डब्यात जशी एकावर एक शरीरं कोसळत जातात, तशी ही अनोळखी, अनोळखी नसलेली पण तरीही परकी वाटणारी माणसं माझ्या या प्रवासाच्या पात्रात गर्दी करून घुसू लागली आहेत.
खरं तर, माणसांची ही गर्दी काही नवी नाही. आपल्याकडे संस्कृतीच्या नावाखाली गर्दीचंच तर उदात्तीकरण चालत आलंय वर्षानुवर्षं. पंढरीची वारी असो की मुंबईची लोकल, आपण झुंडीने चालण्यातच धन्यता मानत आलो. मी मात्र या झुंडीपासून दूर, स्वतःच्या कोशात जगू पाहत होतो. नेमकं त्याच वेळी या सहप्रवाशांच्या गराड्याने मला घेरलंय. प्रत्येकाचे चेहरे वेगळे, प्रत्येकाचे उसासे वेगळे आणि प्रत्येकाच्या गाठीशी असलेला तोच तो, तोच तो जुनाट संसाराचा आणि अगतिकतेचा कचरा. या गर्दीत कोणीतरी जोरात हसतंय, कोणीतरी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर बोटं घासून सुख शोधतंय, तर कोणीतरी निव्वळ शून्य डोळ्यांनी माझ्याकडेच पाहतंय. यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहे..? काहीच नाही. आम्ही सगळे एकाच कालबाह्य झालेल्या गाड्याचे खिळखिळे खिळे आहोत.
पण या गर्दीत एका विचित्र प्रकारचा अस्वस्थ करणारा जिवंतपणा आहे. हा जिवंतपणा मला नकोसा वाटतो, कारण तो मला माझ्या स्वतःच्या जिवंतपणाची, किंवा कदाचित मृतप्राय होत चाललेल्या संवेदनेची जाणीव करून देतो. एकटं राहणं सोपं असतं. तिथे स्वतःच्याच चौकटीत हवं तसं रडता येतं, हवं तसं हसता येतं. तिथे उथळपणाला जागा नसते. पण ही गर्दी..? ही गर्दी मला एकाएकी या चालू जमान्याच्या बाजारात आणून उभी करते. इथे प्रत्येक जण आपापलं जगणं रेटतोय. हा जो काही सहप्रवाशांचा कोलाहल वाढलाय, तो मला सांगतोय की, बाळू, तू कितीही नाकं मुरडलीस, कितीही या सगळ्याला तुच्छ मानलंस, तरी तुला याच मातीच्या, याच थुंकीच्या आणि याच घामाच्या वासातून प्रवास करावा लागणार आहे.
मी थांबायचा विचार करत होतो खरा, पण या गर्दीच्या रेट्याने मला थांबायची सवडच दिली नाही. हा मागून येणारा लोंढा मला पुढे ढकलतोय. हा प्रवास आता माझा उरलाच नाहीये, तो या सगळ्यांचा मिळून एक सामूहिक, अर्थहीन पण अपरिहार्य असा विधी झाला आहे. माझ्या अंतर्मनातली ही जी काही तगमग आहे, ती या गर्दीच्या ढोबळ आवाजात कुठेतरी विरून जातेय. शेवटी काय, माणूस एकटा जन्माला येतो आणि एकटाच मरतो, हे तत्वज्ञान कितीही खरं असलं तरी मधल्या काळात त्याला या असल्या अंगावर येणाऱ्या गर्दीचे धक्के खातच जावं लागतं. हा प्रवास असाच रडत-खडत, शिव्या घालत आणि तरीही हसतमुख मुखवटे चढवून चालूच राहणार आहे, चालू ठेवावाच लागणार आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂