बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

#१५९ ❤️‍🩹🫂

जगण्याच्या आणि मरण्याच्या या अजब रहाटगाड्याकडे पाहिलं की, मन सुन्न आणि मेंदू बधीर होतो. जे मरण मागत आहेत, रोज देवाकडे 'आता पुरे' म्हणून पदर पसरत आहेत, त्यांना मृत्यू हुलकावणी देतोय. आणि दुसरीकडे कालपर्यंत खाऊन-पिऊन सुखात असलेला, हसता-खेळता माणूस अचानक चालता-बोलता किंवा झोपेतच कायमचा शांत होतोय. हे चक्र केवळ अनाकलनीय नाही, तर भयानक आहे. निसर्गाच्या नियमांपुढे आपलं काही चालत नाही हे त्रिकालाबाधित सत्य असलं, तरी आजूबाजूला घडणाऱ्या या घटना डोक्याला अक्षरशः मुंग्या आणतात.

कोविड नावाचं एक वादळ आलं आणि जगाचा भूगोल, माणसाचा इतिहास बदलून गेलं. पण त्याहून मोठा बदल माणसाच्या 'आयुष्यात' करून गेलं. या महामारीनंतर माणसाचं जगणं आणि पर्यायाने त्याचं मरण हे एक फार मोठं, गडद गूढ बनून राहिलं आहे. पूर्वी मृत्यूचं एक गणित असायचं, आजारपणाचा एक टप्पा असायचा, वयाचा एक कयास असायचा. आता ते सगळे आडाखे, ते सगळे नियम निसर्गाने किंवा या काळाने मोडीत काढलेत.

आज माणूस सकाळी भेटतो, हस्तांदोलन करतो, भविष्याच्या गप्पा मारतो आणि संध्याकाळी बातमी येते की तो गेला..! हे कशामुळे होतंय..? वैद्यकीय शास्त्र याला हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट किंवा अन्य काही तांत्रिक नावं देईलही. पण मूळ प्रश्न तिथेच राहतो की, माणसाच्या शरीरात आणि आत्म्यात असं नेमकं काय बदललंय, की जगण्याचा दोर इतका ठिसूळ व्हावा.‌?

या मनस्थितीतून जाताना एक तीव्र अगतिकता जाणवते. आपण विज्ञानाच्या गप्पा मारतो, चंद्रावर-मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतो, पण आपल्या स्वतःच्या श्वासावर आपलं नियंत्रण नाही, ही वस्तुस्थिती थप्पड मारल्यासारखी समोर येते. ज्यांना जगायचंय, ज्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत, ते अचानक निघून जाताहेत, आणि जे थकलेत, ज्यांना वेदनेतून मुक्ती हवीय, त्यांना हा काळ जिवंतपणी मरण यातना भोगायला लावतोय.

हा केवळ योगायोग नाही. कोविडनंतर आपल्या जीवनशैलीत, मानसिकतेत आणि निसर्गाच्या चक्रात काहीतरी असं घडलंय, ज्याचा छडा लावणं माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. आयुष्य हे पाणीदार मोत्यासारखं चमकदार तर दिसतंय, पण ते कधी फुटून हवेत विरून जाईल, याचा नेम उरलेला नाही. या भीषण वास्तवाकडे पाहताना एकच जाणीव तीव्र होते की, माणसाने स्वतःला कितीही शहाणं समजलं, तरी तो अखेर या सृष्टीच्या पटावरचा एक लहानसा प्यादा आहे. आज आहे, उद्या नाही. या गूढ, अनाकलनीय आणि अनपेक्षित जगामध्ये आता प्रत्येक श्वास हा बोनस मानून जगण्यापलीकडे माणसाच्या हातात दुसरं काहीच उरलेलं नाही. काळाचा हा खेळ समजून घेण्याची ताकद आपल्यात नाही, म्हणूनच कदाचित हे अस्वस्थ मन या चक्रव्यूहात अडकून पडलंय.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...