मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६

#१६० ❤️‍🩹🫂

माणूस जन्माला येतो तोच मुळी एकटा आणि मरतोही एकटा, मध्येच हा प्रेमाचा फार्स कुठून येतो देव जाणे. ती आली तेव्हा मला वाटलं होतं की जगण्याच्या या अथांग गढूळ पाण्यात आपल्याला एक हक्काचं बेट मिळालं आहे. पण बेट कसले, ते तर निव्वळ एक मृगजळ होतं, ज्याच्या मागे मी किती धावलो याचा हिशेब मला अजूनही मांडता येत नाहीये. सुरुवातीला सगळंच कसं गोड चाललं होतं, जणू काही नवनिर्माणाचा काळ सुरू आहे. नदी संथ वाहत होती आणि मी माझी गळकी नाव पूर्णपणे तिच्याच किनाऱ्याला बांधून मोकळा झालो होतो.

माझं असणं, माझं वागणं, माझं हे थोडंबहुत गावंढळ पण प्रामाणिक वेडेपण तिला आधी कौतुकाचं वाटत होतं. पण माणसाला सुखाची सवय झाली की त्याला सुरक्षिततेची लागण होते, तिचंही तसंच काहीसं झालं.

माझ्यातला हा आदिम आणि उघडानागडा असा प्रामाणिकपणा पाहून हळूहळू तिच्या पाचावर धारण बसू लागली. तिला अक्षरशः माझी, माझ्या प्रेमाची भीती वाटायला लागली होती.  याचा परिणाम म्हणून तिने माझ्यापासून अंतर राखायला सुरुवात केली, जणू काही मी एखादा संसर्गजन्य रोगाचा रुग्ण आहे. हळूहळू संवादही कमी झाले, शब्दांची जागा कोरड्या शांततेने घेतली आणि मी या विचाराने व्याकूळ होऊन गेलो होतो की, माझं चुकलं कुठं.? आणि नेमकं काय.? तिला विसर पडला की ज्या नावेचा सुकाणू तिने सोडलाय, ती केव्हाच मुख्य प्रवाहापासून तुटलेली होती. आणि म्हणूनच न रहावल्याने एक दिवस मी थेट विचारलं की, अगं.. असं का करतेस..? अशी का वागते आहेस..? काय गुन्हा आहे माझा..? अन् तिने जे उत्तर दिलं, ते ऐकून माझ्या काळजाचा थरकाप उडाला, जणू माझ्या जगण्याचा पायाच खचला. तिचे ते शब्द म्हणजे निव्वळ नकार नव्हता, तर माझ्या अस्तित्वाचाच तो एक क्रूर अपमान होता. त्या क्षणी मला माझे ते जुने, बाळबोध आणि उनाड दिवस आठवायला लागले. हाफ चड्डी आणि मळका, भोकं पडलेला बनियन घालून गावभर उंडारण्याचे ते दिवस, जेव्हा जगात काहीच गंभीर नव्हतं.

त्या वयात, त्या धुळीने माखलेल्या गल्लीत मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यावेळी तिच्यात मी असं काय पाहिलं होतं ते देव जाणे, पण तेव्हा माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात जी एक ठिणगी पडली ती कायमचीच.!

तेव्हा वाटलं होतं, हीच ती मुलगी जी आपल्या या विस्कटलेल्या आयुष्याला एक संथ लय देईल. त्या एका क्षणानंतर माझ्या डोक्यात, मनात किंवा स्वप्नात सुद्धा कधी दुसऱ्या कोणत्याही मुलीचा विचारही आला नाही. कधीतरी मित्रांच्या सांगण्यावरून किंवा एकांताच्या भीतीने दुसरा पर्याय निवडावा असं वाटायचं. पण लगेच माझ्या आतून आवाज यायचा की, अरे वेड्या, हा काय बाजार मांडलायस..? तिला जर कधी कळलं की तू बॅकअप प्लॅन ठेवून फिरत होतास, तर तिच्या नजरेतलं तुझं प्रेम किती स्वस्त ठरेल..? प्रेम म्हणजे काय रेल्वेचं रिझर्व्हेशन आहे का..? एक तिकीट कन्फर्म नाही झालं तर दुसऱ्या गाडीने निघून जायला..?

माणूस एकदाच वेडा होतो, आणि तो वेडेपणा मरेपर्यंत त्याच्या हाडामासात भिनलेला राहतो. वेडेपणाची काही एक्स्पायरी डेट नसते, किंवा तो हवामानासारखा बदलत नाही. तो शरीरातल्या जुन्या दुखण्यासारखा असतो, जो हवा बदलली की जास्त ठणकायला लागतो.

आता या मधल्या काळात तिने दिलेल्या ज्या काही दोन-चार चांगल्या-वाईट आठवणी आहेत, त्या सोबतीला आहेत. त्या आठवणींनाच आता शेवटच्या श्वासापर्यंत कुरवाळत, उशाशी घेऊन झोपावं लागणार आहे. किती विचित्र विरोधाभास आहे पहा, ती माझं अख्खं आयुष्य व्यापून राहिली आहे. आणि तिच्या स्वतःच्या अवाढव्य आयुष्यात माझ्यासाठी साधा सुईच्या टोकाएवढा कोपराही शिल्लक नाही. जगणं ही एक सवय आहे आणि ती आपल्याला कशीतरी निभवावीच लागते. "ती" नाही म्हणून जगणं थांबलेलं नाहीये, पण त्या जगण्यातला उरलासुरला अर्थ मात्र पुरता जळून खाक झाला आहे. आता हा विझलेला कोळसा घेऊनच पुढचा प्रवास करायचा आहे, निमूटपणे, कुठलीही तक्रार न करता. तिला वाटलं असेल की मला दूर सारून ती जिंकली, पण तिला काय माहित मी स्वतःला हरवून बसलोय. या असल्या फसव्या जगात प्रामाणिक असण्याची हीच मोठी शिक्षा असते. तुम्ही तुमचं सगळं काही पणाला लावता आणि शेवटी तुमच्या हातात फक्त रिकामी पाटी उरते.

ती पाटी आता मी छातीशी कवटाळून बसलोय, त्यावर तिने कोरलेले नकाराचे शब्द वाचत. माझं वेडेपण तिला समजलं नाही आणि मला तिचं शहाणपण कधी उमगलं नाही. आम्ही दोघं एकाच पुस्तकाची दोन पानं होतो, जी एकत्र तर होती पण कधी एकमेकांना वाचू शकली नाहीत.

आता आयुष्य म्हणजे निव्वळ दिवस ढकलणं, सकाळ झाली की संध्याकाळची वाट पाहणं. तिच्या आठवणींचा हा पसारा आता माझा कायमचा बिछाना झालाय. त्यावरच लोळत राहायचं आणि स्वतःच्याच मूर्खपणावर हसत राहायचं. कारण या जगात प्रेमळ माणसांपेक्षा व्यवहारी माणसांचीच सरशी होते, हेच अंतिम सत्य आहे. माझी नाव आता बुडाली आहे, पण गंमत बघा, किनारा अजूनही तितकाच शांत आणि निवांत आहे. तिच्या आयुष्यातली माझी जागा शून्य झाली असली, तरी माझ्या शून्याला तिनेच अर्थ दिला आहे. हाच तो खेळ जो नियतीने माझ्याशी खेळला आणि मी तो मोठ्या आनंदाने हरलो. आता कसलीच अपेक्षा नाही आणि कसलीच तक्रारही उरलेली नाही. फक्त एकच उरलंय... ते म्हणजे शेवटपर्यंत फक्त तिचंच होऊन जगणं, अगदी तिच्याही नकळत.

असो, यालाच कदाचित #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂 म्हणतात.!🎭

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...