कधीतरी इनबॉक्समध्ये एखादा असा डीएम अचानक येऊन टपकतो,
सर, आजकाल तुमच्या पोस्टमध्ये तोचतोचपणा येतोय. जरा अपडेट व्हा, काहीतरी वेगळं लिहा, त्याच त्याच चाकोरीतून जरा बाहेर पडा.
असे मेसेजेस वाचून मला वाईट अजिबात वाटत नाही,
आणि डिमोटिव्हेट वगैरे होण्याचा तर प्रश्नच येत नाही.
पण का कुणास ठाऊक, ते वाचल्यावर काही काळासाठी डोक्यातली सगळी पाटी कोरी होते, आणि काहीच सुचत नाही. कारण शांतपणे विचार केल्यावर मला जाणवतं की, त्या अनोळखी वाचकाने मांडलेल्या मुद्यात खरंच शंभर टक्के तथ्य आहे. नंतर मी स्वतःच्याच वॉलवर मागे मागे जाऊन डोकावून पाहतो, आणि मला कळून चुकतं की खरंच, मी काहीच वेगळं असं लिहीत नाहीये. माझ्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक ओळीचा, प्रत्येक कवीतेचा, पर्यायाने प्रत्येक पोस्टचा केंद्रबिंदू फक्त ‘ती’ आणि ‘तीच’ असते. तिच्याभोवतीच माझ्या भावनांचे सगळे फेर धरले जात असतात. खरंच... माणसाचं मन हे मोठं अजब रसायन आहे ना. जे अंतरी वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे जायचं म्हटलं तर जे माझ्या अंतरंगात, माझ्या रक्तात, माझ्या श्वासात शंभर टक्के वसलंय,
तेच तर माझ्या लेखणीतून कागदावर उतरणार ना..?
तिथे खोटेपणाचा आव आणायचा तरी कसा..? आणि का.?
लोकांना वाटतं की लिहणं सोपं असतं, विषय बदलणं सोपं असतं.
पण त्यांना कसं सांगूकी, मी लिहीत नाही, मी फक्त जगलेलं टिपतो.
आम्ही एकमेकांपासून दूर झालो, हे जगासाठीचं एक सत्य आहे.
नितळ काचेला तडा जावा, तसं आमचं नातं तुटून गेलं आहे.
पण तिला विसरणं...? छे... ते मला अजूनही जमलेलं नाही.
आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर, ते मला कधी जमणारही नाही.
माणूस माणसापासून दूर जातो, पण त्याच्या आठवणींपासून कसा दूर जाईल..? ती व्यक्ती आयुष्यातून वजा होते, पण मनाच्या कॅनव्हासवरून मात्र कधीच पुर्णपणे पुसली जात नाही. माझा प्रत्येक शब्द तिच्याच आठवणींची उजळणी करत राहतो. हा तोचतोचपणा नाहीये, ही तर माझ्या प्रेमाची चाललेली अखंड साधना आहे. लोकं म्हणतात अपडेट हो, जगासोबत पुढे चाल, नवीन विषय शोध. पण ज्या मनाचा कप्पा एका व्यक्तीने कायमचा ब्लॉक करून ठेवलाय, तिथं एखादं नवीन सॉफ्टवेअर इंस्टॉल करायचं तरी कसं..? माझ्या मनाचा हा हा कोपरा फक्त आणि फक्त तिचाच आहे, म्हणून तिथं बदल स्वीकारायला माझं मन तयारच होत नाही. एकंदरीत अवघड आहे माझं. खरंच खूप खूप अवघड आहे.
तिच्याशिवाय जगणं शिकलोय, पण तिच्याशिवाय लिहिणं मात्र काही केल्या जमतच नाहीये. माझं हे लिहिणं म्हणजे माझ्या विरहाची रोज बदलणारी माझी व्याख्या आहे. ती दूर गेली तरी तिच्या अस्तित्वाचा "सुगंध" माझ्या शब्दांत दरवळत राहील. वाचणा-यांना हे तोचतोचपणा वाटू दे, माझ्यासाठी मात्र हा तोचतोचपणा माझा खरा जिवंतपणा आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂