रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

काळजाची काळजी... ❤️‍🩹🫂

रात्री अंथरूण जवळ करण्याआधी दहा पंधरा मिनिटे वडीलांचे पाय दाबत बसण्याची सवय लागली आहे. तसं ते कधीच असं पाय दाबून घेत नव्हते, पण मध्यंतरी एक छोटा अपघात झाला होता, त्यामध्ये त्यांच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो पाय जरा कमकुवत झाल्याने तो साधारण दुखतच असतो, म्हणून तेव्हा लागलेली सवय आता दैनंदिन दिनक्रमाचा शेवटचा भाग बनून गेली आहे. त्यांचे पाय दाबत असताना मी कळत नकळत त्यांना वरपासून खालपर्यंत न्याहाळत असतो. त्यांच्या डोक्यावर अगदी फार कमी प्रमाणात शिल्लक राहिलेले आणि चांदी सारखे लख्ख चमकदार पांढरे केस, खोलवर गेलेले डोळे, चेह-यावर भरपूर प्रमाणात असलेली छोटी छोटी तीळं, त्यांचा तो थकलेला चेहरा, अगणित सुरकुत्या, जवळपास लोंबकळणारी अशी त्वचा आणि पायावर ठिकठिकाणी दिसणा-या किरकोळ जखमांचे व्रण, जे कधीकाळी या माणसाने कित्ती धावपळ केली असेल याची साक्ष देत असतात. त्यांच्या श्वासांची अत्यंत संथगतीने सुरू असलेली आवकजावक पाहून माझ्या जीवाला बरं ही वाटतं आणि क्षणभरासाठी मनात नको ते विचार येतात, तेव्हा नकळतपणे कंठ दाटून येतो. मनात या विचारांचं वावटळ धुमाकूळ घालत असताना जेव्हा अगदी अचानकपणे मी भानावर येतो, तेव्हा वाटून जातं की जेव्हा आपणही या वयाचे होऊ तेव्हा आपल्या आजूबाजूला आपली अशी काळजी घेणारं कुणीही नसणार आहे. मनात आलेल्या या एका विचाराने माझं जगणं सद्यस्थितीला कित्ती कोरडं आहे आणि पुढेही कित्ती कोरडं असणार आहे याची मला अत्यंत तीव्रतेने जाणीव होते, आणि मी वडीलांच्या पायातून अगदी पटकन उठून, खोलीत सुरू असलेला एकमेव दिवा बंद करून अंधाराला कवटाळून आतल्या आत कुढत राहतो, रडत राहतो.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...