शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६

आठवणी इतिहासजमा... ❤️‍🩹🫂

सुटया खाद्यतेलाची विक्री बंद..! आज आईनं टीव्हीवरची ही बातमी ऐकली आणि क्षणभरासाठी ती शून्यात हरवून गेली. तिच्या डोळ्यांसमोरून तिचे ते जुने, संघर्षाचे पण मायेचे दिवस झरझर तरंगत निघून गेले असावेत. आज आपण पॅकेज्ड फूड, ब्रँडेड ऑईल आणि मॉल संस्कृतीच्या गप्पा मारतो आहोत, पण या चकचकीत दुनियेच्या मागे एक काळ असा होता जो फक्त आणि फक्त उधारी उसनवारी आणि विश्वासावर चालत होता.

तेव्हा बाबा गावातल्या एका मोठ्या मिलमध्ये कामाला जायचे. संपूर्ण घराचं काय ते एकच उत्पन्नाचे साधन आणि खाणारी तोंडं जवळपास सहा सात..! महिनाअखेरीस जेव्हा पगार व्हायचा, तेव्हाच सगळी देणी भागवली जायची. तोपर्यंत रोजचा संसार कसा चालायचा..? तर केवळ उधारी आणि उसनवारीवर..! गल्लीतल्या एका छोट्याशा किराणा दुकानात आमचं उधारीचं खातं होतं. तो दुकानदार म्हणजे केवळ व्यापारी नव्हता, तर आमच्या सुख-दुःखाचा एक मूक साक्षीदार होता.


त्या काळात आजच्यासारखे हजार-दोन हजार रुपये खिशात नसायचे. मला नीट आठवतंय, घरात भाजी करायची असेल आणि तेल संपलं असेल, तर मी किंवा दादा धावत त्या दुकानात जायचो. दहा रुपयांचं सुट्टं तेल द्या, असं म्हणून छोट्याशा डब्यात, किटलीत, वाटीत तेल घेऊन यायचो. दुकानदारही नेहमीच अगदी हसतमुखाने तेल द्यायचा आणि एका छोट्याशा लाल वहीत आमच्या नावापुढे  तेल १० रुपये असं लिहून तारीख नमूद करायचा. ती दहा रुपयांची उधारी म्हणजेच आमची जगण्याची ताकद होती.


आज सरकारने सुरक्षेच्या आणि हायजीनच्या नावाखाली सुट्या तेलाची विक्री बंद केली असेल, हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्यही असेल. पण त्या निर्णयासोबत एका मोठ्या वर्गाची जुनी जीवनशैली आणि आठवणींचा एक मोठा तुकडा आता इतिहासजमा झाला आहे. मध्यमवर्गीय आणि कष्टकऱ्यांच्या जगण्याचा तो एक काळ होता, जिथे पैशांपेक्षा माणसांमधील विश्वास जास्त किंमती होता. आज आईच्या त्या हरवलेल्या नजरेत मला तोच जुना काळ, बाबांची ती मिल, आणि आमच्या बालपणीचं ते दहा रुपयांचं सुट्टं तेल स्पष्टपणे दिसत होतं.!🎭

#मनात_येईल_ते #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...