भूतकाळ हा वळणावर सुटलेल्या गाडीसारखा असतो असं आपल्याला वाटतं. आपण पुढे निघून जातो, रस्ते बदलतात, माणसं बदलतात. पण गाडीच्या मागे उडणारी धूळ जशी कपड्यांना चिकटून राहते, तसाच भूतकाळही आपल्यासोबत येत राहतो. आपण म्हणतो, गेलं ते गेलं, आता काय त्याचं..? पण खरं सांगू..? ते कुठेच गेलेलं नसतं. ते अगदी सावलीसारखं, अंधारातही न हरवणारं होऊन आपल्या आत कुठेतरी ठाण मांडून बसलेलं असतं.
कधीतरी शांत संध्याकाळी, चहाचा कप हातात धरलेला असताना, अचानकपणे हवेची झुळूक येते. खरंतर तो वारा नसतोच मुळात, ती भूतकाळाची फुंकर असते. मनात साचलेली राख उडवून ती पुन्हा एकदा ती जुनी ठिणगी जागी करते. मग आठवतं ते तिचं हसणं, तिचं अचानक गंभीर होणं, आणि ते 'आपलं' म्हणता म्हणता 'परकं' होऊन कायमचं जाणं. प्रेम ही अशी गोष्ट आहे ना, जी माणसाला एकाच वेळी श्रीमंत आणि कंगाल करून सोडते.
मी आज वरकरणी खूप शांत दिसतो, सुखी असल्याचं नाटकही उत्तम करतो. पोटापाण्याच्या अन समाजाच्या चौकटीत स्वतःला अगदी चपखल बसवून घेतलंय मी. पण आतल्या मात्र अजूनही त्या एकाच माणसाची वाट पाहणं सुरूच असतं. भूतकाळाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. ते तुम्हाला जगायचे सगळे मार्ग मोकळे करून देतं, पण जगू मात्र देत नाही. खरंच... सोप्पं नसतं ना, अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या, ज्या माणसाला आपण पुर्णपणे ओळखतो त्याच्याशी अगदी अनोळखी असल्यासारखं वागणं आणि वागतच राहणं.
एखादं जुनं गाणं कानावर पडलं, किंवा गर्दीत तिच्यासारखाच एखादा चेहरा, तिच्या आवडीचा एखादा रंग दिसला की मानगुटीवर बसलेलं ते भूत खाडकन जागं होतं. तेव्हा अक्षरशः गळा आवळल्यासारखं होतं. काळ बदलला तरी काळाचा हा विळखा मात्र काही केल्या सुटतच नाहीये. त्या जुन्या आठवणी अंगावर येतात, झपाटून टाकतात. मग कळतं, आपण भूतकाळ सोडलाय असं आपण फक्त स्वतःला फसवण्यासाठी सांगत होतो. तो तर अजूनही तिथेच आहे, श्वासात, रक्तात, जगण्यात..!🎭
#आयुष्य_वगैरे
❤️🩹🫂