सरकारी नोकरांसाठी प्रत्येक दोन-चार वर्षांनी एखादा वेतन आयोग धावून येतो. पगार वाढतात, भत्ते वाढतात, थकबाकी मिळते आणि त्या निर्णयाचं स्वागतही होतं. त्यात काही गैर नाही. पण अशा प्रत्येकवेळी मनात एक प्रश्न मात्र काट्यासारखा टोचत राहतो की, या देशात फक्त सरकारी नोकरच जगतात का..? इतर सर्वसामान्य माणसाचं काय.? चाकरमान्यांनाचं काय.?
मी सुद्धा त्या लाखो सामान्य माणसांपैकी एक आहे, ज्याच्या पगाराचा, मजुरीचा किंवा उत्पन्नाचा कोणताही आयोग नसतो. महागाई वाढली की माझ्या खिशातले पैसे आपोआप वाढत नाहीत. पेट्रोल महाग होतं, गॅस महाग होतो, वीज महाग होते, औषधं महाग होतात, मुलांचं शिक्षण महाग होतं, पण माझ्या कष्टाची किंमत मात्र आहे तशीच, आहे त्या जागी तशीच तिथेच उभी राहते.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा होते, तेव्हा वर्तमानपत्रात मोठमोठ्या मथळ्यांनी बातम्या झळकतात. पण रोज जगण्यासाठी स्वतःशी झगडणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्याची बातमी कोण छापतं काय..? त्याच्या संसारात दर महिन्याला बसणाऱ्या आर्थिक फटक्याचा हिशेब कोण मांडतं काय..? हे असलं विदारक सत्य मांडण्याचं धाडस कुणी दाखवतं काय..?
या देशात महागाईचा वेगवान वारू प्रत्येकावर जवळपास एकसारखाच धडकतो. भाजीवाला, शेतकरी, छोटा दुकानदार, खाजगी नोकरी करणारा, हातावर पोट असलेला कामगार यांच्यासाठी कोणता आयोग आहे काय.? दुर्दैव हे की त्यांच्या आयुष्याची इथं कुणालाही कदर राहिलेली नाहीये.
आज परिस्थिती अशी झाली आहे की, कष्ट वाढले तरी उत्पन्न वाढत नाही. स्वप्नं लहान होत चालली आहेत, पण खर्च मात्र सतत उंचावत आहे. महिन्याच्या शेवटी उरतो तो फक्त तुटीचा हिशेब आणि उद्याची काळजी.
माझी ही तक्रार कोणाच्या पगारवाढीविरोधात नाहीये, कोणत्याही वेतन आयोगाविरोधात नाहीये. प्रश्न इतकाच आहे की, न्यायाचा तराजू एका बाजूला इतकाही झुकू नये की दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या सामान्य माणसाचं अस्तित्वच दिसेनासं व्हावं.
कारण राष्ट्र केवळ सरकारी यंत्रणेवर उभं नसतं. ते उभं असतं तिथल्या त्या कोट्यावधी सामान्य माणसांच्या घामावर, ज्यांच्या नावापुढे कोणतंही पद नसतं, पण ज्यांच्या श्रमाशिवाय देशाचा एकही दिवस पुढे सरकत नाही. म्हणूनच कधीतरी एखादा वेतन आयोग नव्हे, तर सामान्य माणूस आयोग ही बसला पाहिजे. किमान एवढं तरी ठरवायला की, जगण्याची किंमत रोज वाढत असताना, जगणाऱ्या माणसाची किंमत नेमकी किती उरली आहे.!🎭
#मनात_येईल_ते #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂