सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

आई.... 🧿❤️‍🩹🫂

 घरामध्ये कामं करायची सवय नाही, असं मुळीच नाही. सुखवस्तू माणसालाही चार गोष्टी स्वतःच्या हाताने कराव्याच लागतात आणि त्यात काही वावगंही नाही. पण कधीतरी एखादा दिवस असा येतो, जेव्हा सकाळचा चहा झाल्यापासून ते रात्री देव्हाऱ्यातली समई विझेपर्यंत हाताखालून काम सुटतच नाही. पाठीचा कणा पार कपाळाला टेकतो, पायाच्या पिंडऱ्या गोळा होतात आणि जीव पुरता वैतागून जातो. एका दिवसाच्या या रगड्याने जेव्हा डोक्यातली चक्रे गरगरायला लागतात, तेव्हा अचानक समोर एक चेहरा उभा राहतो... आईचा..!

कपाळावर घामाचे दोन थेंब, पदराने तोंड पुसत हसतमुख चेहऱ्याने शरद... चहा देऊ का रे..? असं विचारणारी आई. मग एकदम मनात एक तीव्र, धारदार विचार चमकून जातो. आजवर आईनं तिचा उभा जन्म या चार भिंतीत, त्या स्वयंपाक खोलीत स्वतःला कोंडून घेऊन कसा बरं काढला असेल.? काय जादू असेल तिच्याकडे.? आपण एका दिवसात थकलो, विस्कटलो आणि तिने तर सुखाच्या व्याख्या शोधता शोधता तिचं अख्खं आयुष्य त्या कोळशाच्या धुरात आणि गॅसच्या शेगडीसमोर संपवून टाकलं आहे.

वयात येताना प्रत्येकाची काही स्वप्नं असतात. आईचीही असतीलच ना.? पण जेव्हा ती लग्न करून या घरात आली असेल, अगदी सुरुवातीला... जेव्हा या रोजच्या, कधीही न संपणाऱ्या कामाच्या रहाटगाड्याला तिनं स्वतःला जुंपून घेतलं असेल, तेव्हा तिनं स्वतःच्या मनाला नेमकं काय बरं सांगितलं असेल.? कोणता सुसंवाद साधला असेल तिनं स्वतःशी.? 'संसार म्हणजेच समर्पण' हा जुना धडा तिनं घोकला असेल, की 'या माणसांवर माझं प्रेम आहे' या एकाच वाक्याने तिच्या मनातली सगळी वादळं शांत केली असतील.?

माणसाचं मन हे एक अजब रसायन आहे. माणूस जोडणं ही एक कला आहे, पण स्वतःला विसरून कुटुंब जपणं ही तर एक तपस्या आहे. आईने ही तपस्या अगदी सहज केली. तिने कधी तक्रारीचा सूर लावला नाही की कधी हक्काची सुट्टी मागितली नाही. आज ती वृद्ध झाली आहे, तरीही अगदी हसतमुखाने त्याच पिंजऱ्यात उभी आहे. तो पिंजरा आहे हे कदाचित तिला ठाऊकही नसेल, कारण तिने आपल्या प्रेमाने त्या पिंजऱ्यालाच 'घर' बनवून टाकलं.

पण आज मला जाणवतंय की, त्या हसऱ्या चेहऱ्यामागे कितीतरी तडजोडींची राख साठलेली असेल. ज्या खोलीला आम्ही फक्त 'स्वयंपाकघर' समजतो, ते तिचं संपूर्ण विश्व आहे. तिच्या या अविरत प्रवासाकडे पाहिलं की वाटतं, आपण किती स्वार्थी आहोत. तिच्या असण्याला आपण इतकं गृहीत धरलं की, तिच्या अस्तित्वाचे रंग कधी न्याहाळलेच नाहीत. एका दिवसाच्या थकव्याने मला आज "आई" नावाच्या त्या अथांग सागराची आणि तिच्या अपार सहनशीलतेची ओळख करून दिली आहे.!🎭

#आयुष्य_वगैरे

 ❤️‍🩹🫂

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...