नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी निसर्गाने जे काही रौद्ररूप दाखवलं, त्याकडे पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे. हिमालयाचा कडा कोसळला, तिबेटच्या सीमेवर हिमनदी फुटली आणि भोटे कोशी व त्रिशुली नद्यांनी जे काही तांडव मांडलं, त्यात शेकडो निष्पाप जीव क्षणात मातीआड झाले. तो हाहाकार, तो पाण्याचा प्रलय आणि ते वाहून जाणारे पूल-रस्ते टीव्हीवर बघताना अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला असेल. पण खरं सांगायचं तर, हा केवळ निसर्गाचा कोप नाही, तर मानवाच्या अवाढव्य अहंकाराला निसर्गाने दिलेली एक चपराक आहे. तिथं आणि आसपासच्या प्रदेशात चीनच्या काय काय हालचाली आणि कुरापती सुरू आहेत हे काही जगापासून लपलेलं नाहीये. आपल्याला वाटतं की आपण निसर्गाला जिंकलंय. हिमालयाच्या कुशीत मोठमोठे हायड्रोप्रोजेक्ट उभे करताना, नद्यांची पात्रं आक्रसून सिमेंटची जंगलं उभी करताना आपला विकास हसतो. पण ज्या दिवशी निसर्गाचा एक छोटासा नियम बदलतो, त्या दिवशी हाच विकास पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळतो, हे नेपाळने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलंय. सगळ्यात मोठी गंमत पुढेच आहे. प्रलय येऊन सगळं उद्ध्वस्त झाल्यावर आता जगभरातून मदतीचे हात पुढे होतायत. पण नेपाळ सरकारने मात्र का कुणास ठाऊक, बाकी सर्व प्रकारची मदत स्वीकारून परदेशी लष्कर, शोध पथकं वगैरे काहीही पाठवू नका, अशी भूमिका घेतलीय. यात नेमकं काय गौडबंगाल दडलं आहे हे त्यांनाच ठाऊक. बहुतेक २०१५ च्या भूकंपातील जुने हिशोब आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे डावपेच या आपत्तीच्या काळातही खेळले जात आहेत. तिथे हजारो लोक बेपत्ता आहेत, शेकडो भारतीय यात्रेकरू आणि पर्यटक पुरात अडकले आहेत, कित्येकांचा तर थांगपत्ता नाही, आणि इथे सत्ताधारी आपले इगो कुरवाळत बसलेत. निसर्गाच्या आपत्तीला सीमा नसतात, हे आपल्या तथाकथित जागतिक नेत्यांना कधी कळणार..? तिबेटमध्ये हिमनदी फुटते आणि त्याचा फटका थेट नेपाळ आणि भारताच्या बिहारपर्यंत बसतो. निदान यावरून तरी climate change is not a myth ही गोष्ट मानवाने आता ध्यानात घ्यायला हवी. हवामान बदलाच्या गप्पा मारणाऱ्या जागतिक परिषदांमध्ये एसी रूममध्ये बसून कागदी वाघ बनणारे तज्ज्ञ जेव्हा प्रत्यक्ष हिमालयाच्या या ग्लेशियर लेक आउटबर्स्टकडे पाहतात, तेव्हा त्यांचे सगळे आकडे आणि सिद्धांत वाहून जातात. निसर्गाने केवळ माणसाची घरे नाही, तर माणसाचा पोकळ शहाणपणा आणि सिमेंटचे किल्ले वाहून नेले आहेत. शेवटी काय, निसर्ग जेव्हा हिशोब मागायला लागतो, तेव्हा कुठलाही देश, कुठलंही राजकारण आणि कुठलाही पैसा कामाला येत नाही, हाच या नेपाळच्या महाप्रलयाचा सर्वात मोठा धडा आहे.!🎭
#मनात_येईल_ते #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂