निसर्गाची आणि सत्तेची ही वर्षानुवर्षांची युती पाहिली की माणसाच्या कल्पनाशक्तीची मर्यादाही थिटी वाटू लागते. शेतकरी सरकारला मायबाप मानतो आणि सरकार फक्त कागदावर त्याला बळीराजा म्हणून मिरवते. पण या दोन्ही शब्दांमधलं अंतर कधीही न सांधता येणारं असं आहे. दुष्काळ हा काही अचानक आभाळातून टपकणारा आणि फक्त डोळ्यांनी पाहायचा खेळ नाही, तो या काळ्या मातीतल्या माणसाच्या हाडामासाला पोखरत राहतो. पण तरीही सत्तेच्या दालनात बसलेल्यांना हा दुष्काळ म्हणजे केवळ आकड्यांची जंत्री आणि निकषांचे जंजाळ वाटते.
जेव्हा मातीची ढेकळं उन्हाने करपून जातात आणि तलाव, विहिरीं तळ गाठतात, तेव्हा बळीराजा आशेने वर पाहतो आणि नंतर मुंबई-दिल्लीकडे डोळे लावून बसतो. पण तिकडून मदतीचा हात येण्याऐवजी आधी निकषांची भलीमोठी कात्री पुढे येते. इतका पाऊस पडला पाहिजे, इतकी टक्केवारी असली पाहिजे, या गावाची पैसेवारी इतकीच आली पाहिजे, अशा अनेक तांत्रिक शब्दांच्या जंगलात शेतकऱ्याचं जगणं आणि मरणं ही हरवून जातं. स्वतःला मायबाप म्हणवून घेणाऱ्या या व्यवस्थेला आपल्याच पोराचं दुःख मोजण्यासाठी तराजू का लागतो, हा खरा प्रश्न आहे. ही क्रूर चेष्टा नाही तर दुसरं काय..? सत्तेचे पाय शेतक-याच्या बांधावर येताना नेहमीच अडखळतात. जिथं शेतकरी उघड्या आभाळाखाली शेती करतो तिथं बॅरिकेड्स लावून दुष्काळ परिस्थितीची पाहणी अन् पंचनामे केले जातात, हे या कृषीप्रधान देशाचं कित्ती मोठ्ठं दुर्दैव.
बड्या आणि पोकळ घोषणांची भाषा जितकी सोपी आणि प्रवाही असते, तितकीच प्रत्यक्ष मदतीची कृती ही आखडती आणि कोरडी असते. निवडणुका आल्या की बळीराजाच्या नावाचा गजर होतो, त्याला देव्हाऱ्यात बसवलं जातं. निवडून सत्तेत आलो तर ७/१२ कोरा... कोरा... कोरा... अशी भंपक आणि फसवी, संधीसाधू आश्वासन दिली जातात. पण देश पोसणाऱ्या बळीराजावर संकट आल्यावर, त्याच अननदात्याच्या पदरात चार आणे टाकताना या मायबाप सरकारचा हात का थरथरतो..? तो हात इतका आखडता का होतो की शेतकऱ्याने फक्त जगण्यापुरतं आणि पुन्हा मरण्यासाठीच जिवंत राहावं, अशी व्यवस्था निर्माण केली जाते.
हा सारा एक अर्थहीन आणि पोकळ खेळ आहे, शेतकरी संकटात सापडला की त्याला मदतीची आशा दाखवून फक्त झुलवत ठेवलं जातं. वरून रुसून बसलेल्या पावसाची आणि खालून मिळणाऱ्या शासकीय मदतीची जातकुळी एकच झाली आहे, दोघेही वेळेवर कधीच येत नाहीत. शेतकरी आज केवळ एक मतदार, एक आकडा आणि निकषांच्या चौकटीत बसवला जाणारा एक मृतप्राय जीव बनून राहिला आहे. संस्कृतीच्या बाता मारणाऱ्या या समाजात, संस्कृतीचा जो मूळ निर्माता आहे, त्याचीच अशी साळसूदपणे कोंडी केली जात आहे. ही जगण्याची लढाई नसून, व्यवस्थेने शेतक-याच्या अस्तित्वाशी मांडलेला एक जीवघेणा खेळ आहे, ज्यामध्ये हरणारा पर्यायाने मरणारा हा नेहमी आधीच ठरलेला असतो.!🎭
#आयुष्य_वगैरे 🫂❤️🩹