एक कचोरी, दोन समोसा... आणि पुढे जे म्हटलं गेलं, ते ऐकून काळजात कुठेतरी काहीतरी तुटल्यासारखं झालं. गर्दीत उभं राहून, गर्दीचा भाग बनून त्या घोषणा देणं सोप्पं असतं हो, कारण गर्दीला चेहरा नसतो. पण त्या घोषणेच्या आवाजाखाली ज्यांच्या अस्तित्वाचा अक्षरशः चेंदामेंदा होतो, त्याला विचारलंय का कधी की त्यांना काय वाटतं ते..? एखाद्या पुरुषाने गुन्हा केला म्हणून संपूर्ण पुरुषजातीलाच गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करून द्यायचं..? हा कुठला न्याय..?
स्त्रीवर अत्याचार झाला की समाज जागा होतो, आणि व्हायलाच पाहिजे. पण म्हणून पुरुषाच्या नशिबी फक्त संशयाचा फेराच यावा..? काळ बदललाय म्हणतात, पण मला वाटतं फक्त कायद्याची आणि आरोपांची पानं बदललीत, माणसाचं मन अजूनही तिथेच अडकलंय. या तथाकथित पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषालाही मन असतं, तोही रडू शकतो, तोही पीडित असू शकतो, हे कटू सत्य पचवायला हा समाज आजही तयार नाही. पुरुषाच्या डोळ्यातलं पाणी म्हणजे नाटक आणि त्याच्या चेहऱ्यावरचा संताप म्हणजे क्रूरता, असा एक सोपा (गैर)समज या समाजाने बनवून टाकलाय.
लहानपणापासून एका मुलाला काय शिकवलं जातं..? रडू नकोस, तू मुलगा आहेस. खंबीर राहा. जन्माला आल्यापासून तो फक्त जबाबदाऱ्यांची ओझी वाहत असतो. कधी बापाची पत राखण्यासाठी, कधी बहिणीचं लग्न लावण्यासाठी, तर कधी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो स्वतःच्या इच्छांची होळी करत असतो. त्याचा हा त्याग, त्याचं मूक प्रेम, त्याची काळजी करण्याची ती रात्री-अपरात्री जागणारी पद्धत... हे सगळं एका घोषणेच्या आवाजात क्षणार्धात कसं काय विसरलं जातं..?
इतिहास साक्षी आहे हो, पुरुषाने नेहमीच रक्षणकर्त्याची भूमिका निभावली. पण आज स्वतःच्याच अस्तित्वाचं रक्षण करण्यासाठी त्याला पुराव्यांची गरज पडतेय. प्रेम करणारा बाप, पाठीशी उभा राहणारा भाऊ, आणि सुख-दुःखात सोबत देणारा नवरा... हे सगळे पुरुषच आहेत ना..? एकाच्या अमानवी कृत्यामुळे या सगळ्यांच्या कपाळावर अविश्वासाचा शिक्का मारणं कितपत योग्य..?
पुरुषप्रधान समाजात पुरुषालाच गृहीत धरलं जातं, ही खरी शोकांतिका आहे. त्याचं मनोगत ऐकून घ्यायला कोणाकडे वेळ नाही. कारण तो पुरुष आहे, तो सहन करेल, हीच समजूत वर्षानुवर्षे चालत आलीये. पण आता वेळ आलीये, हे ओळखण्याची की गुन्हेगाराला लिंग नसतं. गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो, आणि गुन्हा करणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. शेवटी काय हो, माणुसकी जपणं महत्त्वाचं. मग तो पुरुष असो वा स्त्री. पुरुषाच्या काळजाचा तुकडाही तितकाच नाजूक असतो, फक्त तो दाखवायची सोय या समाजाने ठेवलेली नाही, एवढंच..!🎭
#आयुष्य_वगैरे 🫂❤️🩹