स्वामिनी..

एकत्र राहून सतत खटके उडायचे, म्हणून दादा वहिनी वेगळं राहत होते. दादा भाड्याच्या खोलीत रहायला गेल्यापासून आता जवळपास ५ वर्षे व्हायला आली होती. आणि वेगवेगळे राहिल्यापासून भांडणतंटे कमी होऊन नात्यात गोडवा ही वाढू लागला होता. 

सगळं काही सुरळीत सुरू होतं. गेल्या काही वर्षांपासून दादा ज्या आनंदाच्या शोधात होता, तो आनंद आता त्याला खुणावत होता. वहिनीची डिलिव्हरी जवळ आली होती. तेव्हापासून आईवडिलांचं तिकडं येणं जाणं वाढलं होतं. पण घरातल्या सर्व भांडणांना आधीपासूनच मला दोषी धरण्यात आल्यामुळे मी मात्र तिकडे जातच नव्हतो. आईवडिलांच्याकडून दादा वहिनीची ख्यालीखुशाली जाणून घ्यायचो, बस्स इतकंच. शेवटी आपलं माणूस कुठे का असेना, सुखी असेल तर बस्स. आपल्याला आणि काय हवं.? 

आणि एकदाचा तो दिवस उजाडला. पहाटे पहाटे पप्पांना दादाचा फोन आला, आणि मी काका झालो. सगळं घर आनंदाने नाचू लागलं होतं. वहिनी आणि बाळं दोघेही सुखरूप होते. पण का कुणास ठाऊक, बाळाला काचेच्या पेटीत ठेवलं होतं. आईवडिलांना आभाळ ठेंगणं झालं होतं. एव्हाना छोट्या मोठ्या कामाने दमणारे आईबाबा दवाखान्यात धाव धाव धावत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याची एक रेषही दिसत नव्हती. पण काही केल्या अजूनही मी दवाखान्यात पाऊल ठेवलं नव्हतं. का कुणास ठाऊक पण हिंमतच होत नव्हती. आता दोन तीन दिवस उलटले होते, तरीही बाळं अजूनही काचेच्या पेटीतच होतं. दररोज संध्याकाळी हसतखेळत घरी परतणारा आईवडिलांचा हसरा चेहरा हळूहळू चिंताक्रांत दिसू लागला होता. शेवटी न राहवून मी विचारलंच, तेव्हा आईनं रडत रडतच सांगितलं की, बाळाच्या डोक्यात खूप पाणी आहे. किती दिवस जगेल, काही सांगता येणार नाही. एक आठवडा, एक दिवस, एक महिना काहीच ठाउक नाही. बाळं जागेपणी एकसारखं फक्त रडतच असतं रे. इवलासा जीव तो, बोलणार तरी काय.? त्याचं दुखणं त्यालाच ठाऊक. माझ्या काळजात धस्स झालं, आणि काय बोलावं ते क्षणभर मला काही सुचेनासे झाले. अचानक दादा आणि वहिनीचा चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला. डोळे पुसत पुसत मी आईवडिलांना इतकंच बोललो की, डिस्चार्ज मिळाला की वहिनीला इकडे घेऊन या.

 दिवसामागून दिवस जात होते. आता वहिनीला डिस्चार्ज मिळूनही महिना उलटला होता. पण वहिनी इकडे न येता, थेट भाड्याच्या खोलीतच गेली होती. आई दिवसभर तिकडे जायची, आणि दिवसभर तिथं थांबून संध्याकाळी इकडच्या घरी परतायची. संध्याकाळी घरी आल्यावर ही सर्वात आधी आई देवासमोर खूप वेळ बसलेली असायची. तिथं ती काहीच बोलायची नाही, पण डोळे मात्र एकसारखे वाहत असायचे. 

आता एक महिन्याची झाली होती ती. दादा स्वामीभक्त, म्हणून तो तिला 'स्वामिनी' अशी हाक मारत होता. मी दररोज संध्याकाळी आईकडून स्वामिनीची ख्यालीखुशाली विचारायचो, तेव्हा आई सांगायची की, खूप गोड आहे रे स्वामिनी. रूंद आणि भलंमोठं कपाळ, टपोरे डोळे, आणि गोरी गोरी पान वगैरे नाही हं ती. सेम टू सेम तिच्या बाबांवर गेली आहे. हे सगळं बोलत असतानाही आईला हुंदका आवरणं कठीण जायचं, आणि ती रडू लागायची. देवाला दोष देऊ लागायची. त्या एवढ्याश्या जीवाने तुझं काय वाईट केलं आहे रे. त्याला सोड, आणि मला उचल की रे. आईचा तो हंबरडा ऐकून क्षणभर सगळं काही थांबल्याचा भास व्हायचा. घर एकदम शांत असल्यावर जाणवणारी घड्याळाची टिकटिक ही बंद झाल्यासारखी वाटायची. आता सतत पडलेले चेहरे पाहून घराला स्मशान कळा आली होती. स्वामिनी जन्माला आल्यापासून आईवडिलांचं दादाच्या खोलीवर जाणं, आणि रात्री उशिरा परतणं, हे सुरूच होतं. मलासुद्धा स्वामिनीला पहायची, तिला मांडीवर घ्यायची, तिच्या डोक्यावरून हात फिरवायची, तिचे टपोरे डोळे पहायची, त्या डोळ्यांत स्वतःला पहायची, आणि तिला एक काका आहे, हे सांगायची खूप इच्छा झाली होती. पण काही केल्या अजूनही मी तिला पहायला, वा दादाला भेटायला गेलोच नव्हतो. 

नेहमीसारखा एक दिवस उजाडला. रात्री दादाच्या मांडीवर झोपलेली स्वामिनी सकाळी उठलीच नाही. भल्या पहाटेच स्वामिनी काहीच हालचाल करत नाहीये, म्हणून रडत रडतच दादाने पप्पांना फोन केला. मी अजूनही अंथरूणातच होतो. आईबाबा लगबगीने आहे तसे निघून गेले, आणि सात साडेसातच्या दरम्यान मला पप्पांचा रडत्या अवस्थेत फोन आला की, आपलं बाळं आपल्याला सोडून गेलं रे. माझे कान बधीर झाले. मी लागलीच आहे तसाच भावाची खोली गाठली. वहिनी दगड होऊन एका कोपऱ्यात बसली होती. माझं बाळं झोपलयं, उगाच दंगा करू नका, हे एकच वाक्य ती सतत बडबडत होती. दादा आणि पप्पा एकमेकांच्या गळ्यात पडून अक्षरशः लहान मुलासारखे रडत होते. मी वडिलांना इतकं रडताना कधीच पाहिलं नव्हतं. माझी आजी गेली, तेव्हा सुद्धा माझे वडील इतके रडले नव्हते. स्वामिनी माझ्या आईच्या मांडीवर पडून होती. तिचे डोळे अजूनही उघडेच होते. तिला नेमकं काय झालं असेल, ते मला कळतच नव्हतं. आई एकसारखी छाती बडवून घेत होती, आणि स्वामिनीच्या चेह-यावरून हात फिरवत होती. भल्या सकाळी त्या रडण्याच्या आवाजाने सगळी गल्ली गोळा झाली होती. जो तो काय झालंय याची चौकशी करत होता, आणि शेवटी अरे रे.. अशी हळहळ व्यक्त करून पुन्हा आपापल्या मार्गी निघून जात होता. मी आईजवळ जाऊन बसलो. तशी आई आणखीन जास्तच रडू लागली, आणि मग मीसुद्धा स्वामिनी... म्हणून टाहो फोडला. आईनं स्वामिनीला माझ्या मांडीवर दिलं. ते बघून वहिनी म्हणाल्या की, पिल्लू, कोण आलंय बघ. काका आलाय तुझा.‌ उठ पाहू. जागी हो झोपेतून. आई एकसारखी छाती बडवून घेतच होती, दादा आणि पप्पांच्या रडण्याचा आवाज आता वाढतच चालला होता, आणि मी एकसारखा स्वामिनीच्या डोळ्यात पाहत होतो. का कुणास ठाऊक, पण राहून राहून सारखं मला असं वाटत होतं की, बहुतेक फक्त आपल्या काकाला पहायलाच स्वामिनीने डोळे उघडे ठेवून आपला प्राण सोडला असावा. स्वामिनी डोळे उघडे ठेवून निपचित पडली असली, तरी तिचे टपोरे डोळे खूप प्रश्न विचारत होते. काका, तू इतके दिवस का आला नाहीस रे.? कित्ती वाट पाहिली मी तुझी. माझा मुक्काम फार दिवस नाहीये, हे माहीत असूनही तू लवकर का आला नाहीस रे.? काका, या छोट्या प्रवासात मी सर्वांना भेटले, पण तुला भेटायचं राहूनच गेलं रे..! 

मी जन्माला आल्यापासून हा असा प्रसंग पहिल्यांदा अनुभवत होतो. आपलं कुणीतरी आपल्याला कायमचं सोडून जाणं, म्हणजे काय, हे आत्ता लक्षात येत होतं. आता स्वामिनीला निरोप द्यायची वेळ जवळ आली होती. इतका वेळ एका कोपऱ्यात शांत बसलेली वहिनी अचानक धाय मोकलून रडू लागली. माझं बाळं घेऊन जाऊ नका, माझं बाळं मला द्या, तिचा तो काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश आता सहन होत नव्हता. तितक्यात दादा माझ्या जवळ आला. आणि म्हणाला की, काय झालं रे हे.? मी आणि दादा एकमेकांसमोर मांडीला मांडी लावून रडत होतो, आणि स्वामिनी माझ्या मांडीवरून हे सगळं काही पाहत होती. तितक्यात स्वामिनी बोलल्याचा मला भास झाला. काका, किती मस्त वाटतंय रे तुम्हा दोघांना एकत्र पाहून. नेहमी असेच एकत्र रहा. मी पुन्हा येईनच.! ती फक्त मलाच भेटणं बाकी होतं, म्हणून तिला माझ्याच हाती सोपवलं होतं. स्वामिनीचा शेवटचा सगळा प्रवास माझ्या कुशीतच झाला. मी एकसारखा फक्त आणि फक्त तिच्या टपो-या डोळ्यात पाहत होतो, आणि का कुणास ठाऊक, मला त्यात एकच प्रश्न दिसत होता. काका, इतके दिवस तू का आला नाहीस रे.? कित्ती वाट पाहिली मी तुझी.!🎭

#आयुष्य_वगैरे 

#अडगळ 💔

#गोष्टी_नशीबाच्या 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..