समुद्र
प्रिय सखी
सप्रेम नमस्कार.!
पत्रास तसं विशेष काही कारण नाही, पण ब-याच गोष्टी ज्या मी कॉलवर बोलू शकत नाही, किंवा मला बोलायचं असूनही मी तुझा आवाज ऐकण्यात हरवून गेल्यावर बोलायच्या राहून जातात, त्या माझ्या सुप्त भावनांना वाट करून द्यायचा माझा हा छोटासा प्रयत्न.
तुझ्या आयुष्यात येणाऱ्या कडू गोड अनुभवांनी तू समृद्ध होत, हळूहळू बदलत जात असताना, तुझं हे बदलणं म्हणजे माझ्यासाठी नेमकं काय याचा उलगडा मला कधी होतच नाही. कारण कधीकधी तुझ्या मागं मागं फिरायचो, कुठंतरी कोपऱ्यावर थांबायचो तेव्हा मला तू समुद्रासारखी वाटायचीस, आणि मी एक नदी. आणि प्रत्येक नदीला जन्मजातच समुद्राला भेटायची ओढ असते. पण माझ्या बाबतीत मात्र वेगळंच घडलं ना गं. समुद्राच्या भेटीच्या ओढीनं माझी नदी कोरडी पडते आहे, हे कळल्यावर समुद्र स्वतःच माझ्याकडे आला. कित्ती नशीबवान ना मी. म्हणूनच तर आपल्या पहिल्या भेटीत मी म्हणालो होतो की,
"दिलेस तू एवढे की,
आता काय मागू सांग.?
एका भेटीतच फेडलेस तू
माझ्या वेड्या प्रेमाचे पांग.!"
बस्स.. आता आणखी काय नको.
उरलं आयुष्य जगायला हा इतका आधार ही पुरेसा आहे, असं वाटलं.
पण आपली ओळख वाढत गेली तसतसं हळूहळू मला उमगू लागलं की, समुद्र असणं ही सोप्पं नाहीये. हा विशाल असा पसरलेला समुद्र आतून खूप रिता आहे आणि कोरडा पडत चालला आहे. सगळ्यांना सामावून घेऊन स्वतः इतकं रितं राहणं, या समुद्राला कसं बरं जमत असेल.? ना कुठली तक्रार, ना काही मागणं.! जे काही वाट्याला येईल ते हसतमुखाने स्वीकारायचं, आणि प्रेमळ लाटांच्या तुषारांनी सर्वांना चिंब भिजवत, सतत कडकडून भेटायचं. कितीही मुसळधार पाऊस पडला तरीही त्या पावसात ढगाला भिजता येत नाही ना ,तसंच काहीसं या समुद्राचं झालं आहे. सगळं काही आहे, पण काहीच नाही. सुखदुःख, आशा-अभिलाषा यांच्या सीमेपलीकडे जाणं तसं खूप अवघडच. सगळं काही स्वीकारत समुद्र स्वतःच अस्तित्व पार विसरून गेला आहे, आणि ते हरवलेलं अस्तित्व शोधायला समुद्राला वेळही नाहीये. ना सुख, ना दुःख, ना प्रेम, ना तिरस्कार.!
या अवस्थेत पोहचायला तसं सगळ्यांना आवडतं, पण हा प्रवास किती जीवघेणा असतो, हे ज्यानं भोगलयं त्यालाच ठाऊक असतं. रितेपणा म्हणजे काय असतं, ते समुद्राला आता चांगलंच उमगलं आहे. म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची पर्वा न करता, स्वतःकडे जे काही आहे, ते तो मुक्तहस्ते उधळतो आहे. कारण समुद्राला वाटतं की, हे रितेपण आणखी कुणाच्याही वाट्याला यायला नको. इतकंच सांगेन की, रितं व्हा, पण स्वतःच अस्तित्व जपा.!
लाडक्या चिमणीस गोड गोड मुका.!😘
आणि शेवटी 'फक्त तुझाच' वगैरे लिहायची मला काहीच गरज वाटत नाहीये, कारण की आणखी कुणाचा कधी झालोच नाही, किंबहुना तसा प्रयत्न मी केलाच नाही.
#खुशबू #वेड 🌼🌼🌼 #आयुष्य_वगैरे
#गंध_आठवणींचा ❤️