घरटं
काही भावंडांत इतकं कमालीचं understanding दिसून येत की, आपल्या त्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही. सगळं काही scripted आहे असं वाटू लागतं, पण तसं काही नसतंच. सगळं खरं असतं, ख-याखु-या माणसांनी जगलेलं, भोगलेलं..
"तेव्हा सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण वडिलांनी अचानक अकाली एक्झिट घेतली. मी ब-यापैकी मोठा आणि माझी दोन लहान भावंडं, यांना कवेत घेऊन आई दिवसभर रडत बसलेली असायची. महिने दोन महिने असेच निघून गेले. आईला अशा अवस्थेत घरी ठेवून शाळेत माझं मन लागत नव्हतं. काय झालं होतं काय माहित, पण आईला दिवसरात्रीचं ही भान उरलं नव्हतं. सारखं एकटक फक्त घराच्या चौकटीकडे नजर लावून बसलेली असायची."
"वडील गेल्यापासून शेतीकडं दुर्लक्ष होत होतं. काकाच्या सोबतीने मी हळूहळू तिकडं लक्ष वाढवलं. काकानंही कधी काही तक्रार केली नाही. वर्षामागून वर्षे सरत जात होती, पण आईच्या वागण्यात तसा काही फारसा फरक पडलेला नव्हता. दररोज सकाळ दुपार संध्याकाळ काकू येऊन आईचं सगळं काही आवरून जायची. माझी धडधाकट आई गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतःहून जागची हलली नव्हती. मधल्या मुलानं शेतात भरपूर प्रगती केली, सगळ्यात लहान मुलगा प्राध्यापक झाला, घरी दोन सुना आल्या, नातवंडं झाली, या सगळ्याचं आईला काहीच सोयरसुतक नव्हतं. तिची नजर नेहमीप्रमाणेच घराच्या चौकटीला भिडलेली.!"
"जुनं घर मी माझ्याकडे ठेवून घेतलं होतं. अगदी त्याला लागूनच मुख्य रस्त्याच्या वाटेला मधल्याचा टुमदार बंगला आणि मुख्य रस्त्याच्या अगदी कडेला सगळ्यात लहान भावाचं घर. मी काहीही न सांगता अगदी खूप आधीपासूनच भावंडांनी जबाबदा-या वाटून घेतल्या होत्या. सगळ्यात लहान प्राध्यापक असलेल्या भावाने कुटुंबातील सगळ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. मधल्या भावाने शेतीचं आव्हान स्वीकारून ते पेललं ही होतं, आणि त्याला आधुनिकतेची साथ देत आणखी ३ एकर जमीन विकत घेतली होती. कुटुंबाचा बाकी सर्व खर्च तो लिलया पार पाडायचा. मी तसा एकटाच, अगदी मागच्या वडिलोपार्जित जुन्या घरात आईसोबत रहायचो. लग्नाची कधी इच्छा झालीच नाही, आणि तसा विषय कधी कुणापुढे काढला ही नाही. आपलं वडील नाहीत, आपल्याला खूप जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत, सगळं सुरळीत सुरू ठेवायचं आहे, ही खूणगाठ खूप लहानपणीच मनाशी बांधली होती, म्हणून बहुतेक. पण मी आणि आई अगदी मागच्या जुन्या घरात आहोत म्हणून एकटे पडले होते असेही काही नव्हते. येणाजाणा-या सगळ्या माणसांचा राबता, सुना, नातवंडं या सगळ्याचं बस्तान दिवसभर आमच्यापाशीच असायचं."
"जुन्या घराचा दरवाजा गेल्या कित्येक वर्षांपासून कधीच बंद केला नव्हता. त्यामुळे तिथं चिमण्यांचं येणं जाणं खूप असायचं. आणि काही चिमण्यांनी तर घरच्या तुळईवर, कौलांच्या फटीत आपली घरटी घातलेली होती. दिवसभर त्यांचं ते चिवचिव सुरूच असायचं, आणि सतत ते भुर्रकन बाहेर उडून जाणं, आणि क्षणार्धात परतून येणं. घरी येणाजाणारी मंडळी ही नेहमीच कौतुक करायची, की भारी आहे राव तुमचं. या चिमण्यांपायी तुम्ही तुमच्या घराचा दरवाजा कधीही बंद करत नाही, आणि हे ऐकत असताना बाजूच्या भिंतीला टेकून बसलेली आई एकटक चौकटीवर नजर रोखून पाहत असायची.!"
#आयुष्य_वगैरे #गंध_आठवणींचा #गावाकडच्या_गोष्टी ❤️