काव काव..
आज अलार्म वाजण्याच्या आधीपासूनच रमाकांत ची झोप उघडली होती. उत्सवाचं वातावरण आणि त्यातच रविवार सुट्टीचा दिवस, त्यामुळे आज निवांत उशीरापर्यंत झोपायचं, असं त्यानं ठरवलं तर होतं, पण पहाटे साधारण तीन चार वाजल्यापासून सुरू असलेल्या एका कावळ्याच्या कावकावाने त्याच्या झोपेचे खोबरं करून टाकलं होतं. ब-याचदा हुसकावून देखील तो कावळा अजूनही गेला नव्हताच. एकसारखं ते काव काव काव काव...! नुसता वैताग आणला होता. शेवटी नाईलाजाने रमाकांतने बिछाना सोडलाच. अलार्म वाजायला अजूनही अर्धा पाऊण तास बाकी होता. आता झोप मोडलीच आहे, म्हणून मग सर्वात आधी त्याने तो अलार्म बंद केला. नेहमी प्रमाणे रात्री झोपताना बंद करून ठेवलेला मोबाईल हाती घेतला, आणि सुरू केला. लागलीच धडाधड दोन तीन मेल, भरपूर मेसेजेस आणि आईचे खूप सारे पडलेले missed calls रमाकांतला दिसले. तसा तो बावचळलाच. म्हणून मग त्याने लगेचच आईला call back केला, पण तिकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. भरपूर वेळा call करूनही आई call receive करतच नव्हती. तसा मग रमाकांत आणखीनच घाबरला. म्हणून मग त्याने शेजारच्या घरी फोन केला, तेव्हा कुठे मग त्याला हायसे वाटले. रमाकांतची आजी आज पहाटे पहाटे वारली होती. तो निरोप देण्यासाठीच आई फोन करत होती, आणि आता तिची आणि बाकी मंडळींची रडारड सुरू आहे, म्हणून कुणीही माझा फोन रिसिव्ह करत नाहीये. रमाकांतने फोन ठेवला. सगळ्या प्लॅनिंगची वाट लागली आता, म्हणून तो डोकं पकडून बसला. आजची सुट्टी वाया जाणार, आणि आता उद्या परवाही सुट्टी पडणार. स्वतःशी पुटपुटत त्याने भरपूर शिव्या हासडून घेतल्या. त्या कावळ्याची कावकाव अजूनही सुरूच होती. रागारागाने रमाकांत बाहेर पडला, आणि हातात एक भला मोठा दगड घेऊन कावळ्याला शोधू लागला. आवाज तर येत होता, पण कावळा काही केल्या दिसत नव्हता. तितक्यात सोसायटीच्या कंपाऊंड बाहेरच्या कडूनिंबाच्या झाडावर बसलेला तो कावळा रमाकांतच्या नजरेत आला. त्याला फक्त हुसकवायचं असा विचार करून रमाकांतने सहज भिरकावलेला हातातील तो दगड, त्या कावळ्याच्या नेमका वर्मी बसला, आणि क्षणार्धात तो कावळा गतप्राण झाला. आता मात्र रमाकांतचा मूड आणखीनच जास्त ऑफ झाला. तसाच हताशपणे तो रूमवर परतला. सर्वात आधी मॅनेजरला संबंधित गोष्टींचा आणि सुट्टी हवी असल्याचा मेल केला. बाकी सगळी आवराआवर केली, आणि आपल्या आजीच्या शेवटच्या अंत्यदर्शनासाठी तो आपल्या गावी निघाला.
रमाकांत कोल्हापूर जवळच्या चिखली गावचा.! चिखली.! अगदी छोटंसं पण निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव.! गेल्या तीनेक वर्षांपासून रमाकांत कामानिमित्त पुणे येथे. रमाकांत तसा आधीपासूनच एकलकोंडा आणि नास्तिक. त्यामुळे त्याला सोबत कुणी असलं काय किंवा नसलं काय, काही फरक पडत नसायचा. माणसाचा सर्वात चांगला मित्र हा एकांतच आहे, स्वतःला आणि स्वतच्या क्षमतेला योग्य प्रकारे जाणून घ्यायचं असेल तर एकांताशिवाय पर्याय नाही, असे तो नेहमीच म्हणायचा.
क्रमशः
अपुर्ण 😑
#आयुष्य_वगैरे #अडगळ #गोष्टी_गावाकडच्या