दोन मोदक
बाप्पा... काळजी घे.! शिस्तीत, व्यवस्थित जा. घरी पोहचल्यावर ख्यालीखुशाली कळवं. आणि हो.., पुढल्या वर्षी लवकर ये, तुझी आतुरतेने वाट पाहीन. इतकं बोलून, मी पुन्हा एकदा बाप्पाला मनोभावे नमस्कार केला. थोडा खोल पाण्यात उतरलो, उशीरापर्यंत तसाच उभा होतो, पण अचानक बाप्पाच हात सोडून निघून गेला असं वाटलं, आणि तसंच झालं बहुतेक. अचानक ऊर भरून आला. हुंदका अडकून आता याचक्षणी जीव जातोय की काय असं वाटू लागलं. आजूबाजूला हजारो लोक आणि त्यांच्या पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तिथं त्या हजारोंच्या गर्दीतही अचानक किती एकटं एकटं वाटू लागलं होतं. कुणीतरी आपलं हक्काचं आपल्याला कायमचं सोडून जातंय असं वाटत होतं. त्या गर्दी, गोंगाटातून हळूहळू बाहेर पडलो. लागलीच घर जवळ केलं. पुरता भिजून गेलो होतो. दुपारपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप अजूनही सुरूच होती. अधेमधे येणारी हवेची एखादी झुळूक अंगावर काटा आणत होती. घरात प्रवेश करताच नजर पुन्हा एकदा बाप्पा विराजमान झालेल्या त्या जागेवर गेली. अचानक काळजात धस्स झालं. घराचा जिवंतपणा हरवल्यासारखं वाटत होतं. तिथं बाजूलाच उभी असलेली अगरबत्ती ही आता श...