दोन मोदक
बाप्पा... काळजी घे.!
शिस्तीत, व्यवस्थित जा.
घरी पोहचल्यावर ख्यालीखुशाली कळवं.
आणि हो.., पुढल्या वर्षी लवकर ये, तुझी आतुरतेने वाट पाहीन. इतकं बोलून, मी पुन्हा एकदा बाप्पाला मनोभावे नमस्कार केला. थोडा खोल पाण्यात उतरलो, उशीरापर्यंत तसाच उभा होतो, पण अचानक बाप्पाच हात सोडून निघून गेला असं वाटलं, आणि तसंच झालं बहुतेक. अचानक ऊर भरून आला. हुंदका अडकून आता याचक्षणी जीव जातोय की काय असं वाटू लागलं. आजूबाजूला हजारो लोक आणि त्यांच्या पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तिथं त्या हजारोंच्या गर्दीतही अचानक किती एकटं एकटं वाटू लागलं होतं. कुणीतरी आपलं हक्काचं आपल्याला कायमचं सोडून जातंय असं वाटत होतं. त्या गर्दी, गोंगाटातून हळूहळू बाहेर पडलो. लागलीच घर जवळ केलं. पुरता भिजून गेलो होतो. दुपारपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप अजूनही सुरूच होती. अधेमधे येणारी हवेची एखादी झुळूक अंगावर काटा आणत होती. घरात प्रवेश करताच नजर पुन्हा एकदा बाप्पा विराजमान झालेल्या त्या जागेवर गेली. अचानक काळजात धस्स झालं. घराचा जिवंतपणा हरवल्यासारखं वाटत होतं. तिथं बाजूलाच उभी असलेली अगरबत्ती ही आता शेवटच्या घटका मोजत होती. अंग पुसून, कपडे बदलून थोड्याच वेळात अगदी नॉर्मल होऊन मी माझी नेहमीची खिडकीची जागा पकडून बाहेर पाहत बसलो. खूप लांबवर सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीचे आवाज अजूनही कानावर येत होते. निवडक ढोल-ताशा पथके, नाहीतर सर्रास फक्त डॉल्बीचा दणदणाट. त्या ढगात खूप उंचावर प्रकाश फेकणा-या लाईटांचा तर किती काय तो सुकाळच जणू. मनात किती आणि काय काय विचार येऊन जात होते. अधेमधे अचानकच बाप्पांच्या सजावटीसाठी लावलेल्या रंगबिरंगी लाईटांची माळ लक्ष वेधून घेत होती, पण बाप्पांचा मोकळा गाभारा पुन्हा एकदा जिव्हारी लागत होता. पुर्ण हंगामात दडी मारून बसलेला पाऊस गेल्या दोन तीन दिवसांपासूनच नेमका धो-धो बरसू लागला होता. काय करावं, काहीच सुचत नव्हतं. म्हणून मग पटकन दोन घास खाऊन झोपी जायचा विचार ठरला. पटकन अंथरूणात शिरलो. पावसात खूप वेळ भिजल्यामुळे अंगात गारठा भरला होता. अधेमध्ये एकसारख्या खूप शिंका येत होत्या. म्हणून मग डोक्याला लोकरीची टोपी घातली आणि झोपी गेलो. तरीही राहून राहून मनात सारखं सारखं एकच विचार येऊन जात होता की, बाप्पा हात सोडून निघून गेला, बाप्पा... आपला हात सोडून निघून गेला.
झोप लागून तासभरच झाला असेल, तितक्यात कुणीतरी जोरजोरात थापा मारत असल्याचं मला जाणवलं. तसा मी ताकडन बेडवर उठून बसलो. आजूबाजूला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. एकसारखं दाट धुकं पसरल्यासारखं वाटत होतं. मला कुठं जावं काहीच कळत नव्हतं. ती दारावरची थाप एकसारखी वाजतच होती. आलो आलो... थांबा.. असं बोलावं म्हटलं तरी कंठातून आवाज बाहेरच पडत नव्हता. पण मी अंदाजाने पाऊल पुढे पुढे टाकत जात असताना आश्चर्यकारकरित्या धुकं नाहीसं होतं जात होतं आणि मला पुढचं अगदी स्पष्टपणे दिसत होतं. मी दरवाज्याशी पोचलो आणि पटकन दरवाजा उघडला. पाहतो तर काय, बाहेर कुणीही नाही. जिकडे पाहावे तिकडे फक्त आणि फक्त दाट धुकं. कुणीतरी आपली फिरकी घेतयं, असा विचार करून मी दरवाजा बंद करत असताना नजर सहज खाली गेली आणि तिथं एक कागद पडलेला दिसला. तो मी लागलीच उचलला आणि धाडकन दार आपटून बेडवर येऊन पडलो. बेडवर आल्या आल्या पहिला मनात एक विचार हा येऊन गेला की, मगाशी घरभर पसरलेलं ते दाट धुकं आता अचानक कुठं हरवलं.? किती वाजलेत पहावं म्हणून मोबाईल पाहिला तर मोबाईलची बॅटरी डेड झालेली दिसत होती. भिंतीवरचं घड्याळ पहावं तर तेही बंद पडलेलं दिसत होतं. मला चांगलंच आठवत होतं, बाप्पांना निरोप देण्यासाठी निघालो तेव्हा मी घड्याळ शेवटचं पाहिलं होतं, नेमकी तीच वेळ अजूनही घड्याळात दिसत होती. मोबाईल चार्जिंगला लावावं म्हटलं, तर चार्जर नेमका कुठं ठेवलाय काहीच आठवत नव्हतं. टिव्ही लावून न्यूज चॅनलवर वगैरे वेळेचा अंदाज घ्यावा म्हटलं तर सगळ्याच चॅनलला फक्त मुंग्या आलेल्या दिसत होत्या आणि तो तीव्र असा खर्रखर्रखर्र आवाज. तितक्यात तो दरवाज्यात पडलेला कागद आपण आत आणलाय, त्याची आठवण झाली. म्हणून मग टिव्ही बंद करून मी बेडरूमकडे धाव घेतली.
पिवळा लखोटा होता तो, आणि उजव्या बाजूला एकदम खालच्या कोपऱ्यात, एक छोटंसं पण कित्तीतरी सुबक, सुंदर आणि अगदी सजीव असं जास्वंदी फूलाच चित्र. आलटून पालटून बरेचदा पाहिलं मी, पण त्यावर कुठेही काहीही लिहिलं नव्हतं. म्हणून मग मी तो लखोटा खोलायचं ठरवलं. आतमध्ये अगदी गडद लालसर कागदावर, पिवळ्याशार अक्षरांनी लिहलेले एक पत्र होतं.
मी अगदी अधाशीपणे ते वाचू लागलो...
प्रिय वगैरे काहीही म्हणणार नाही, पृथ्वीतलावरील तुम्ही सगळेजणच मला खूप खूप प्रिय आहात, आणि नेहमीच असणार आहात. या पत्रास कारण की, मी आत्ताच अगदी व्यवस्थितपणे घरी पोचलो आहे. इकडे सगळे काही उत्तम आहे. आई-बाबा, बंधूराजे आणि आमचे सरकार मला खूप miss करत होते, मला पाहून त्यांना झालेला आनंद मी शब्दात सांंगू शकत नाही. बाकी तुझ्या घरी असताना तसं बोलायची खूप इच्छा होती, पण ते आमच्या कायद्याच्या चौकटीत बसत नाही, म्हणून बरचसं बोलायचं राहून गेलं, ते बोलण्यासाठी हा पत्राचा खटाटोप.
मी जरी देव असलो तरी कधी कधी मलाही तुम्हा माणसांच्या मनात नेमकं काय चाललंय ते काहीच कळत नाही रे. तिथं एकाजागी गप्प बसून सारं काही पहावं लागतं. मनात कित्तीतरी प्रश्न असतात, पण सगळीच अनुत्तरीत राहतात. तुझ्या घरी मला गेल्या वर्षीप्रमाणे चैतन्य नाही दिसलं रे. कधी कधी तर मला प्रश्न पडायचा की, माझ्या समोर हाडामासांची माणसं उभी आहेत की माणूस नावाची यंत्र.? किती तो कृत्रिमपणा. मी माझ्याशी वागण्याबद्दल म्हणत नाहीये हं, पण निदान ते तुमच्यातील एका माणसाने लिहील्याप्रमाणे... माणसाने माणसांशी माणसांसम वागणे. हे सुध्दा मला चुकल्या चुकल्या सारखं वाटतं होतं. जितके दिवस मी तुझ्या घरी होतो ना, तितके दिवस मला घरात माणूस आणि माणूसपण शोधावं लागतं होतं. तुझं बारकं लेकरू इतकं उदास का असतं? त्याची कुणीच साधी विचारपूस ही का करत नाही? दररोज माझ्या आरतीच्या वेळी जोरजोरात घंटा वाजवणारं ते बारकं लेकरू, आरती झाल्यावर तुम्ही बाकी कुणीही आसपास नसताना, माझ्या समोर उभं राहून, डोळ्यात पाणी येईपर्यंत स्वतःला थोबाडीत मारून का घेत असतं? माझ्यासाठी घरात दररोज मोदक केले जायचे, पण त्या बारक्यानं घरचा एकही मोदक खाल्ला नाही, एकदा शेजारच्या घरातून प्रसाद म्हणून आलेले दोन मोदक त्याने खाल्ले, तेच त्याने यंदा खाल्लेले मोदक, आणि तुम्ही कुणी त्या गोष्टींकडे लक्षही दिलं नाही. ते बारकं लेकरू दररोज आतल्या खोलीत एकाकी रडत रडत झोपी जातं, पण तुम्हा जन्मदात्यांना त्याची ती घुसमट जराशी ही लक्षात का बरं येऊ नये? ते वरतून जसं दिसतंय, तसं आतून जगत नाहीये. गेल्या वर्षी घरात एक छोटीशी परी, बोबडे बोल बोलत फिरायची, यंदा ती माझ्या समोर मला कुठेच दिसली नाही. तिची आई सुद्धा दिसली नाही, आणि तिचा नवरा सुद्धा, म्हणजे तुझं मोठ्ठं लेकरू. माझ्या मनात किती आणि काय काय विचार येऊन जात होते, मला माझ्या देवत्वावर आणि देव असण्यावरही शंका येऊ लागली होती. दररोज रात्री तुम्ही निवांत झोपी जायचात, पण मला काही केल्या झोप येत नसायची. मी रातभर तुमच्या घरात येरझाऱ्या घालत रहायचो. सकाळी तुम्ही झोपेतून जागे होण्याआधी पुन्हा माझ्या जागेवर जाऊन बसायचो. किती गुंतागुंत आहे रे तुम्हा माणसांची. किती नाटकी वागता तुम्ही. कसं जमतं हे असं वागायला.? आम्ही तुम्हाला घडवलं तेव्हा तर तुम्ही असे नव्हता रे, आधुनिकतेच्या नावाखाली तुम्ही माणूसपण आणि माणूसकी हरवून बसला आहात. साक्षात देवाला सुद्धा कोड्यात पाडता तुम्ही म्हणजे नवलच आहे तुमचं.
भलं मोठं घर आहे तुमचे पण मला तिथं करमत नव्हतं रे, कारण तिथं तुम्ही सुखी नाही आहात. आणि जिथं तुम्ही सुखी नाही आहात, तिथं मला तरी सुख कसं लागेल? तुला माहीतीये, मी घरी आल्या आल्या सर्वात आधी आईबाबांच्या गळ्यात पडलो, खूप म्हणजे खूप भरून आलं होतं मला, कारण इच्छा नसतानाही तुला सोडून आलो होतो, वाटत होतं की इथंच रहावं तुझ्यापाशी अणि तुझी सगळी विस्कटलेली घडी पुन्हा एकदा सावरावी, पण बाबांना हे सगळं सांगितल्यावर बाबा बोलले की, आपण फक्त निमित्तमात्र आहोत, शेवटी सगळं काही माणसांची कर्मच ठरवत असतात. मला निरोप देताना तुला जे वाटलं ना, ते अगदीच योग्य वाटलं. हो.. तू मला पाण्यात सोडलं नाहीस, तर मीच तुझा हात सोडला होता. सावध हो माणसा... देवाला जपण्याआधी आजूबाजूच्या माणसांना जप, नात्यांना जग आणि मनापासून जप. 'सुरूवात' आणि 'शेवट' जरी मी असलो, तरी हा मधला सगळा प्रवास या नात्यांच्या आधारानेच पार करायचा आहे.
वाचत वाचत पार शेवटाला आल्यावर माझ्या लक्षात आलं की, जसजसा मी वाचत जात होतो, तसतसा वाचलेला प्रत्येक शब्द नष्ट होत जात होता. मला ते पत्र पुन्हा एकदा वाचायचं होतं, पण आता ते शक्य नव्हतं. काही वेळाने हातात फक्त तो लखोटा आणि रिकामा कागद शिल्लक राहिला होता, आणि त्या लखोट्यावरील ते सुंदर, सुबक जास्वंदीचं चित्रही आता दिसेनासं झालं होतं.
अचानक जोरजोरात मोबाईलचा अलार्म वाजू लागला आणि मला जाग आली. तसा मी ताडकन उठून बसलो. आजूबाजूला पाहिलं सगळं काही नेहमीसारखच होतं. बारक्या नेहमीसारखा आतल्या खिडकीजवळ बसून बाहेर पाहत चहा पीत होता. बायको आंघोळ वगैरे आवरून देवधर्म करण्यात मग्न होती. मी सहज हॉलमध्ये डोकावून पाहिलं. तिथं बाप्पा नव्हता, तो कधीचा त्याच्या घरी पोहचला होता, आणि आकाशवाणी वर संत एकनाथ महाराजांच्या अभंगाच्या
नाही रे, नाही रे कुणाचे कोणी
नाही रे, नाही रे कुणाचे कोणी
अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणुनी.. या ओळी कानावर येत होत्या.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ