भाकरी

आज खूप दिवसांनी शिळ्या भाकरीचा तुकडा ताटामध्ये आला. तसा तो आवडीचाच, पण तरीही आज सहज काही वर्षांपूर्वीचे जुने दिवस आठवून गेले. तेव्हा कामाची वेळ आणि मेसची वेळ जमत नसायची, त्यामुळे जेवण म्हणजे मेसचा डबा हे समीकरण जवळजवळ फिक्सच झालं होतं. सकाळचा नाष्टा म्हणून काहीतरी बजेटमधील पोटात ढकलायचं, आणि त्यावर पुन्हा एक हाफ चहा ढकलला की मग लवकर भूक लागत नसायची. तासाभराच्या प्रवासानंतर कामाला लागण्याआधी आणखी एखादा हाफ चहा, पुन्हा एकदा पोटात ढकलला की, दुपारी जेवणाच्या सुट्टीपर्यंत जेवणाचं गणित जवळजवळ वजा होऊन जायचं. त्यातही कधी कधी जास्तीची कडकडून भूक लागली तर ग्लासभर पाणी पिऊन कळ काढावी लागायची. तेव्हा ची ती मेसही तशी बजेटमधीलच, त्यामुळे आलटून पालटून तेच ते. एक पातळ भाजी, एक सुकी भाजी, दोन चपाती/भाकरी, रेशनच्या मोठमोठ्या तांदळाचा अगदी भूठभर भात, एक दोन कांद्याचे काप, लोणच्याची एक अगदी छोटीशी फोड वगैरे वगैरे. डब्यात चपातीचा दिवस असायचा तेव्हा विषेश काही वाटायचं नाही, पण भाकरीचा दिवस असला की दुपारी जेवताना डबा उघडल्यावर पहिला प्रश्न हा पडायचा की, आपला हा डबा नेमका कधी भरला गेला असेल.? कारण #भाकरी तोडून, भाजीत बुडवून खात असतानाच त्याचे तुकडे पडायला लागलेले असायचे. क्वचितच तोंडात घास जायचा, नाहीतर ब-यापैकी सगळं बोटांतून निसटून पुन्हा ताटात पडलेलं असायचं. अशावेळी मग आईने सांगितलेली गोष्ट आठवायची, भाकरीचं असंच असतं बाळं.. ताजी ताजी केली आणि लागलीच डब्यात बांधली काय, किंवा तशीच उघडी ठेवली काय, ती वाळली की थोड्यावेळाने तिचे तुकडे पडू लागतातच. मग अशावेळी #भाकरी सरळ पातळ भाजीत कालवायची आणि खायची.!🎭
#आयुष्य_वगैरे
#गंध_आठवणींचा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..