23/10/2022

तसं पहायला गेलं तर अधेमध्ये आई आंघोळ घालतेच, पण दिवाळीच्या काळात आपल्या वाट्याला येणारी, आईच्या हातची आंघोळ, कित्तीतरी अभंग अशा आठवणींनी समृद्ध असते, बहुतेक म्हणूनच या 'अभंग' अशा आठवणींच्या स्नानाला 'अभ्यंगस्नान' म्हणत असावेत. आपल्या अंगाला हळूवार हातांनी तेल/उटणे लावत असताना, मंजूळ आवाजात एखादी अंगाई सुरू असावी, त्याप्रमाणे तिचं हे आठवणींचा सडा शिंपन सुरूच असतं. तिच्याकडून आपल्या बालपणीच्या त्या गोष्टी ऐकून आपल्याला खूप हसू येत असतं, आणि कुतूहलाने आपण विचारत असतो की., आई.., खरंच मी असा वागायचो काय गं लहानपणी.? दिवाळीसाठी माहेरी आलेल्या आत्त्याच्या मुलांशी सर्वात आधी आंघोळ करण्यासाठी भांडणं, आंघोळीच्या आधी तेल/उटणे लावून घेण्यासाठी ताई/आई समोर उघडाबंब बसला असताना थंडीने अंगावर येणारा शहारा, ताईने मुद्दामहून काढलेली आपली खोड, डोळ्यात साबणाचा फेस गेला की आपली होणारी रडारड, काल रात्री हातावर काढलेली मेहंदी आता आंघोळ करताना धुवून जाईल काय गं आई.?? या आपल्या प्रश्नावर सगळ्यांना अनावर झालेलं हसू.., अशा कित्येक समृद्ध आठवणींच, आपल्याला समृद्ध करणारं, हे अभ्यंगस्नान..!!🎭

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..