१४ ऑक्टोबर २०२१
प्रिय सखी,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
पत्रास कारण की, आपल्या मैत्रीच्या नात्याबद्दल थोडं बोलायचं होतं. अगं.. कधी काळी तुझ्या भेटीसाठीची, तुला एकदा बघण्यासाठीची ओढच एवढी होती ना की, आता तू भेटल्यावर तुझ्या प्रेमळ सहवासात जात असलेला प्रत्येक क्षण, एक एक दिवस सतत स्मरणात राहतो. इतक्या वर्षांनी तू अशी माझ्या आयुष्यात येशील याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती, आणि आज ते सगळं याची देही याची डोळा अनुभवतोय, तरीही माझा विश्वास बसत नाही. आज फक्त ५ महिने झालेत गं आपल्या मैत्रीला. पण असं वाटतं की खूप खूप लहानपणापासून आपण एकत्रच वाढलोय. हे असं वाटण्यात सुद्धा तुझा खूप मोलाचा वाटा आहे, कारण तू इतक्या चांगल्या पद्धतीने मला समजून घेतलं आहेस व आपलसं केलं आहेस. Thanks दोस्त. या आपल्या मैत्रीच्या थोड्याशा कालावधीत तू मला इतकं भरभरून प्रेम दिलयसं ना की, एवढ्या या प्रेमावर आणि तुझ्या या गोड आठवणींवर मी माझं उर्वरीत आयुष्य अगदी आनंदाने जगू शकतो. आणखी काही नको मित्रा, फक्त अशीच साथ दे तू मला.!!
मैत्री आपली फुलासारखी
तशीच ती फुलपाखरासारखी
एकमेकांच्या सहवासात
आठवणींचा गंध
मनसोक्त लूटणारी.!
मैत्री आपली रानपाखरांच्या
चिवचिवाटासारखी
सतत अविरत मुखी असणारी,
कधी कधी अबोल असूनही
खूप काही बोलणारी.!
मैत्री आपली
परतीच्या पावसासारखी
धो धो बरसून,
चिंब भिजवून
मन सुखावणारी.!
मैत्री आपली धुक्यासारखी
गुलाबी थंडीची चाहूल देणारी
मायेची प्रेमाची ऊब देणारी
क्षणापुरतीच नाही तर
सदैव साथ देणारी.!
मैत्री आपली सावलीसारखी
थकल्या भागल्या जीवाला
विसावा देणारी ,
स्वत:सोबत इतरांना जपणारी.!
मैत्री आपली अशीच असावी
निस्वार्थ सदैव बहरत रहावी
तुझ्या सुखात
तू मला आठवावे
तुझ्या दुःखात मी
तुला कधीही न विसरावे.!