भाऊबंद
भावकी.!! भावा भावात शक्यतो कधीच पटत नाही, अपवाद असतीलही, पण फारच दुर्मिळ. घरोघरी मातीच्या चुली, अन् आमच्या घरीही तेच चित्र होतं. पप्पा लहान भाऊ, काका मोठा भाऊ, त्यात आणि काका 'टाकेश' गटातील. त्यामुळे सुट्टी दिवशी आणि प्रत्येक संध्याकाळी घरात वातावरण तसं तंगच असायचं. काकांकडून आजोबांना, वडिलांना, बायकां पोरांना किरकोळ मारहाण व होलसेल मध्ये शिव्या ठरलेल्याच असायच्या. या साऱ्या खटाटोपात घरच्या दोन सुना म्हणजे माझी आई आणि काकी हकनाक भरडल्या जायच्या. तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती, त्यामुळे घरचं, शेताकडचं, जनावरांचं हे सारं करून त्या दोघींचा जीव पार मेटाकुटीला आलेला असायचा. माझा भाऊ दोनेक वर्षांचा असेल आणि मी अजून आईच्या पोटात बहुतेक चार पाच महिन्याचा. तेव्हा अशा प्रत्येक वेळी माझ्या काकीनं माझ्या आईला खूप आधार दिलाय. कधी कधी तर वातावरण इतकं बिघडलेलं असायचं की रात्रीच्या वेळी घरात कुणीच जेवलेलं नसायचं. सगळे तसेच उपाशीपोटी झोपलेले असायचे. अशा प्रत्येक वेळी माझ्या काकीनं रात्री अपरात्री उठून माझ्या आईच्या पोटात अन्नाचा दाना टाकलाय, कारण ती पोटूशी होती म्हणून. माझ्या काकीच्या या कधीही फेडता न येणा-या उपकाराची जाणीव, माझ्या आईला आजही आहे. म्हणून माझ्या काकांनी आम्हाला भूतकाळात कितीही त्रास दिलेला असला तरी आत्ता त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी माझी आई फक्त एवढी एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून बाकी सारं काही विसरून जाते. अन् म्हणूनच बहुतेक बालपणापासूनच, आईनं आम्हां दोघां भावंडांना काकीला 'काकी' असं हाक मारायला कधी शिकवलचं नाही, तिलाही आम्ही दोघं भावंडं "आई/मम्मी" अशीच हाक मारतो., आजही.!!🎭
#प्रेम_आई
#आयुष्य_वगैरे