सुट्टीचा दिवस

आज खूप दिवसांनी त्याची भेट झाली. सुट्टीचा दिवस म्हणून मी मुद्दामच त्याच्या घरची वाट धरली होती. मी त्याच्या घराजवळ पोहचलो, तेव्हा साधारणपणे दहा, सव्वा दहा वाजले होते. पण त्याच्या घराचे दार बंद होते. बाहेर कुलूप ही दिसत नव्हतं. पहिला मी दोन तीन हाका मारल्या. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, शेवटी मी दाराची कडी जोरजोरात वाजवली, तसा लगेचच आतून, आलो आलो, असा आवाज आला. त्याने आतली कडी काढली. आत येताना त्याने बाहेरचे दार पुन्हा बंद केले होते. मी घरात इकडे तिकडे नजर फिरवत होतो. घरात प्रचंड धूळ जमली होती, फक्त नेहमीच्या वापरातील वस्तूंच स्वच्छ दिसत होत्या. तो कधीच माझ्या बाजूला येवून बसला होता. शेजारच्या घरातून रेडिओ वर लागलेलं भक्ती गीत ऐकू येत होतं, घरात बहुतेक तोच काय तो आवाज. मी त्याला आणि त्याच्या घराला असं कधीच पाहिलं नव्हतं. मगाशी त्याच्या घरात प्रवेश करतानाच मला एका गोष्टीची उणीव प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे त्याच्या अंगणात नसलेली रांगोळी. पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे काय बोलावं आणि कसं बोलावं, हे मला काहीच कळत नव्हतं. पण शेवटी या पेचातून त्यानेच मला बाहेर काढले, आणि तो बोलू लागला..,
"कामात असताना हवासा वाटणारा सुट्टीचा दिवस, नेमका सुट्टीच्या दिवशी नकोसा झालेला असतो. नेहमीसारखं रात्रीच्या जेवणातील शिल्लक दोन चपात्या, एक भाजी आणि घासभर भात, पोटाच्या आतड्याला भेटायच्या ओढीनं पडून असतात. डोळे उघडल्यापासून घरात जाणवणारी शांतता दिवसभर मन कुरतडत असते. आठवडाभर पळून पळून दमलेलं घड्याळ ही आज काही घाईत नसतं, त्यांच्या प्रत्येक काट्यात आज कमालीचा संथपणा जाणवत असतो. त्यात अधेमध्ये पालीचं चुकचुकणं, घरात मी एकटे नाही, हे जाणवून देत असतं. घरातल्या प्रत्येक जागेशी संबंधित एखादी आठवण मला सतत खुणावत असते. शेजा-यांनी त्यांच्या अंगणातील तुळशीत लावलेल्या अगरबत्तीचा वास नकळतपणे घरात घुसत असतो. त्या तेवढ्याशा सुवासाने ही माझ्या मेलेल्या मनाला आठवणींचे कित्तीतरी उमाळे फुटू लागलेले असतात. अंथरूणातून पटकन उठून चहा करायचं ही होतं नाही, कारण काल सकाळची आणि रात्रीची भांडी अजूनही तशीच न्हाणीत पडलेली असतात. काल रात्री दूध तापवायचं विसरल्यामुळे ते नासलं नासले असेल, ही शक्यताही मनात डोकावून जात असते. मग तासभर तसंच पडून राहून घराच्या छपराला न्याहळत राहातो. नेमकं सकाळी सकाळी आणि रात्री झोपायच्या वेळीच हे सगळं नको नको ते का आठवतं, या एका विचाराने मनात धुमाकूळ घातलेला असतो." 🎭
#आयुष्य_वगैरे
#त्याच्या_मनातलं

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..