अडगळ

काल खूप दिवसांनी तो भेटला. तसं ठरवून आम्ही फारच कमी वेळा भेटलोय, कारण तसं जमतच नाही. दुपारची वेळ. यंदा उन्हाचा ताव ही नेहमीपेक्षा जास्तच. सावली, किरकोळ गप्पा टप्पा आणि चहासाठी आम्ही लागलीच टपरी जवळ केली. छोटंसं पत्र्याचं खोकं, पण तिथं मिळत नाही अशी कुठली गोष्ट नव्हती. मी चहा सांगणार, तितक्यात त्यानं मला थांबवलं आणि म्हणाला की, शरद तू बहुतेक जेवला नसशील अजून. आपण एक काम करूयात, आधी मस्तपैकी तुझा आवडता गरमागरम वडापाव खाऊ आणि मग चहा घेऊ. मी हसून होकार दिला. दोघांनाही तीन तीन वडापाव खाल्ले. मस्त वाटलं. मग काही क्षणांतच मस्त वाफाळणारा चहाचा ग्लास टेबलावर बसून आमच्याकडे पाहू लागला. उन्हाच्या झळा आता आणखी खूपच तीव्र जाणवत होत्या. अंग घामानं पुरतं भिजून गेलं होतं. अधेमधे येणारी हवेची एखादी झुळूक खूपच सुखावून जात होती. मी त्याला काही विचारणार तितक्यात तो बोलू लागला. आपण वयाची छत्तीशी कधीच ओलांडलीय. अजून किती जगू माहीत नाही. तुला तर माहीतच आहे, आता जवळपास तीन वर्षे व्हायला आली, मी एकाकी जीवन जगतोय. मला कुणीच नाही असं नाही, पण तरीही मी एकाकीच आहे, आणि इथून पुढेही असाच एकाकी असेन. दिवस कामाच्या व्यस्ततेत कसाबसा निघून जातो. एखादा सुट्टीचा दिवस ही मी पैशांच्या चणचणीमुळे ओव्हरटाईम मध्ये काढतो. दररोज संध्याकाळी मित्रांना वगैरे भेटतो. कधी कधी माझा जुना वर्गमित्र म्हणजे तू सुद्धा भेटतो. पण का कुणास ठाऊक, मनातलं आतलं रितेपण संपत नाही रे. आपण एवढेही वाईट नाही, आणि नव्हतो ही. तरीही हे असे विचित्र भोग आपल्या वाट्याला का यावेत, ही एक सल कायम मनाला कुरतडत असते. सामान्य माणूस मी, तशीच माझं स्वप्नंही अगदी सामान्यच होती रे. माझ्या आजूबाजूला माझ्या सगळ्या मित्रांचं, नात्यातल्या सर्वांचं, सगळं काही बरं चाललं आहे. आणि ते पाहून मला आनंद होतोच, पण कधी कधी नकळतपणे वाटून जातं की, काश... आपलं ही असंच सगळं चांगलं झालं असतं तर.! पण नाही.., आता मुळात इच्छाच उरली नाही रे कसलीही. आज ना उद्या आई-बाप आपल्याला सोडून निघून जाणार, काही निवडक मित्र कितीही जीव लावत असले तरी त्यांचाही प्रपंच आहे रे, ते तरी किती दिवस माझं मडं खांद्यावर घेऊन फिरणार. आणि दादाही त्याच्या व्यापात नेहमीच मग्न, एखादं दिवस आई घरी नसली तर तो जेवला खाल्लास काय.? असं विचारत ही नाही. आईबाप हयात असताना हे असं घडत आहे, तर मग त्यांच्या माघारी कसं व्हायचं रे माझं.? हातपाय हालतात, कष्ट करून खातोय, हीच काय ती एक समाधानाची बाब. आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला पेंशन तरी कुठली रे, आपल्या माथ्याला तर जन्मजात फक्त आणि फक्त टेन्शन..!! शेवटी एक मात्र खरं की कुणालाही कितीही जीव लावला तरी, आपल्या आईबापा सारखं निस्वार्थ प्रेम दुसरं कुणीही या जगात करत नाही. त्यांचं बोलणं ऐकून नेमकं काय बोलावं तेच मला सुचत नव्हतं, तितक्यात त्याचा फोन वाजला, आणि तो घाईघाईने माझा निरोप घेऊन लगेचच निघून गेला, आणि जाताना त्याचं नेहमीच आवडतं वाक्य तो आवर्जून बोलला.., ते म्हणजे पुन्हा भेटूच.! तो निघून गेला, तरी त्याच्या फोनची रिंगटोन अजूनही माझ्या कानात वाजत होती.. 

आला एकला गेला एकला
मातीमंदी बांधला खोपा
गुंतला जीव मातीत
खेळे मातीत जाय मातीत..! 🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..