अडगळ..!! २४/१२/२०२२
आजपासून वीकेंड वगैरे. तसंही आज चौथा शनिवार सुट्टीच होती, तरीही एकाच अडलं नडलं काम म्हणून ओव्हरटाईम वर होतो, फक्त माणूसकीच्या नात्याने, आर्थिक लाभ वगैरे काही नाही. ते किरकोळ असं काम होतं, तीनेक वाजेपर्यंत आवरलं. आज ब-यापैकी लवकरच गावात परतलो होतो. आता घरी लवकर जाऊन तरी काय करायचं.? म्हणून मग बस स्टॅंडवरच आणखी तासभर बसूयात असं माझं ठरलं. गाड्यांची, प्रवाशांची लगबग सुरू होती. अधेमध्ये गाड्यांचं होणारं announcement, त्यानंतर लगेचच लागणारं एखादं गाणं वगैरे. तरीही मन तिथं रमत नव्हतं. आता तिथं बसून मला जवळपास अर्धा पाऊण तास उलटून गेला होता. तितक्यात ती ओळखीची हाक माझ्या कानावर पडली. दादा.., अहो दादा... पुन्हा एकटेच बसले आहात. त्याला खूप दिवसांनी पाहून मला मस्त वाटलं. मला सुद्धा आता चहाची तलफ झाली होती, म्हणून मग नेहमीप्रमाणे आम्ही चहाबरोबर गप्पा मारण्यासाठी टपरीकडे मोर्चा वळविला. टपरी कडे जात असताना मला कुतूहल लागून राहिलं होतं की, आज हा आपल्याशी नेमकं काय बोलणारं.? गाड्यांची प्रचंड ये-जा सुरू होती. एकसारखी धूळ उडत होती. त्यातच शिट्ट्या मारत मारत, गाड्या अडवून 'पांढरा' बगळा 'माणसेमारी' करत होता. दररोजच होतं हे, म्हणून तिकडं मी दुर्लक्ष केलं. एव्हाना चहाचा कप आमच्या हाती आला होता. मी एकसारखा त्याच्याकडे पाहत होतो, पण आज तो काहीच बोलत नव्हता. म्हणून मग मीच विचारलं की., आणि काय मग..? मजेत ना.? तो मिश्किल हसला आणि म्हणाला की.., अरे., मजेतच चाललंय सगळं. आला गेला दिवस ढकलायचं. सामान्य माणसं आपण. सुखाचे क्षण शोधत फिरत असतो, पण एखादा गवसला तरी घाईगडबडीत तोही नीटसा जगायचा राहून जातो. तेव्हा मग कधी कधी वाटून जातं की.., यार... तोच.., तोच तर क्षण होता..! यार......., त्या.., नेमक्या त्याच क्षणी आपल्याला मरण आलं असतं, तर कित्ती बरं झालं असतं..!! पण फक्त आपल्या वाटण्यावर ही दुनिया तर चालली नाही ना रे.
नेहमी प्रमाणेच त्याच्या गूढ बोलण्याची पार्श्वभूमी मला काही केल्या लक्षात येत नव्हती. त्याचं बोलणं ऐकत ऐकत माझी नजर कधी त्या 'पांढ-या बगळ्यावर' स्थिरावली होती, ते माझं मलाच कळलं नाही. एका ट्रकच्या कर्कश हॉर्नने भानावर आलो तेव्हा, मी तिथं एकटाच होतो. तो कधीचा निघून गेला होता, नेहमीप्रमाणे.!!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
#त्याच्या_मनातलं