मनातला पाऊस...! १५/०९/२०२२

हा पाऊस कधी कधी उनाड मुलासारखा वाटतो. घरची मंडळी याच्या बाल लीलांनी पार वैतागून गेलीयेत. आजूबाजूच्या परिसरात ही याची दहशत आहे. तसा हा खूप गोड आहे. पण सतत काहीतरी कांड करत असतो, म्हणून सारे याच्यावर जरा चिडूनच. तसं त्याच वयही ते काय, फारफार तर नाजूक हातांनी एखादा फटका देऊ आपण इतकंच, नाहीतर खूप जोरांनी ओरडू त्याच्यावर. म्हणून मग याला शिस्त लागावी, यासाठी वसतीगृह शाळेत खूप खूप खूप लांब धाडलयं. अथांग असा निळाशार समुद्र नेहमी उशाला असूनही तिथं त्याला करमत नाही. आपल्या माणसांच्या ओढीत त्याचा जीव सतत कावराबावरा होत असतो. मग अधेमध्ये तिथून पळ काढून घरी येऊन तो धिंगाणा घालून जातो, तो अवकाळी.!! मग तो असा वागायला नको म्हणून त्याला वर्षातून ठराविक दिवस घरी जायची मुभा दिली, तरीही तो जातो, ते धिंगाणा घालतच, आणि सुट्टया संपल्यावर वसतीगृहाकडे परतणं तर त्याच्या जीवावर येत. मग हात पाय बडवत, खूप जोरजोरांनी रडत, घरभर धिंगाणा घालत, नाईलाजाने तो जातोच, तो परतीचा पाऊस.!! अशी असते ही आपल्यांची ओढ, जवळ असताना आपलं लक्ष जात नाही अन् जीवघेणा दुरावा काही केल्या सोसवत नाही.!!🎭

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..