अगं... ऐक ना..
तुझी आठवण येत नाही असं काही नाही, पण दररोज उठून, मी सतत तुला तेच ते सार काही पुन्हा पुन्हा सांगणं हे ही बरोबर नाही. तुला आवडेल, ना आवडेल, तुला काय वाटेल, काय वाटत असेल, ही भीती पण असतेच ना गं.!
कधी कधी आठवणींच्या एखाद्या गोड क्षणाने अचानक भरून आलेलं डोळे, तेव्हा तुझ्याशी खूप खूप खूप काही बोलावंस वाटणं, कधी कधी तुला पहायला, तर कधी तुझा आवाज ऐकायला माझं मन कावरबावरं होतं, या सा-या गोष्टींवर माझं नियंत्रण अजिबात नसतं. अचानक एखादा आठवणींचा झोका येतो, आणि मला अलगद त्याच्या कवेत घेऊन जातो, पण मी सतत तुला तेच ते सार काही पुन्हा पुन्हा सांगणं हे ही बरोबर नाही. तुला आवडेल, ना आवडेल, तुला काय वाटेल, काय वाटत असेल, ही भीती पण असतेच ना गं.!
दररोज मला माझ्या सभोवती दिसणारे शेकडो चेहरे, थोडेसे ओळखीचे अन् कितीतरी अनोळखी, पण त्या सा-यांच्या गर्दीत तुला सतत शोधणा-या माझ्या मनाला कसं समजवावं, आणि भावनांना बांधून कसं ठेवावं, हे मला काहीच कळत नाही. कधी कधी सभोवताली दिसणा-या प्रत्येक व्यक्तीत जेव्हा तुझाच चेहरा दिसू लागतो, तेव्हा मी आनंदाने हसत असतो आणि मी एकटाच का हसतोय म्हणून माझ्या आसपासचे माझ्यावर हसत असतात. कधी कधी मग मोबाईलची गॅलरी चेक करताना तुझा ठेवलेला तो एक स्टेटस आठवतो., " जो लोग किस्मत में नहीं, उन्हें गॅलरी में संभाल के रखा हैं ना." हो. खूप नसतीलही कदाचित, पण एक दोन फोटो तरी सांभाळून ठेवलेतच गं मी. कधी कधी मोबाईल तर वाजलेला नसतो, पण मी उगाचच अधेमधे चेक करत असतो की, तुझा तर मेसेज आला नाही ना ? मोबाईलची रिंग वाजली की वाटतं, तुझाच तर फोन आला नाही ना ? कधी आपलं ते काही महिन्यांपूर्वीचं सतत सुरू असलेलं बोलणं आठवून मी खूप खूप सुखावतो, तुझा शब्द न शब्द तेव्हा माझ्या डोळ्यासमोर नाचू लागतो, तुझ्या हसण्याचा तो आवाज, मग माझं अंतरंग रोमांचित करून जातो, अशावेळी मग स्वतःशीच थोड पुटपुटत मी स्वतःवरच हसतो, आणि पुन्हा वेड्या मनाला समजावून शांत करतो. मी सतत तुला तेच ते सारं काही पुन्हा पुन्हा सांगणं हे ही बरोबर नाही. तुला आवडेल ना आवडेल, तुला काय वाटेल, काय वाटत असेल, ही भीती पण असतेच ना गं.!
कधी कधी तुझ्याशी बोलायचं तर खूप खूप असतं, अशा वेळी शेवटी निरोप घेताना भरून आलेल्या मनाला आणि दाटून आलेल्या हुंदक्याला कसं सावरावं, हे मला काहीच कळत नाही, पण हे सारं काही तुला कळलं नाही पाहिजे, याची मी खूप खूप काळजी घेतो. माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून खुश असणारे माझे आप्तस्वकीय पाहून मला खूप छान वाटत, आणि याचं एकमेव कारण तूच आहेस हे जाणून मग मला आभाळही ठेंगणं वाटतं. पण मी सतत तुला तेच ते सारं काही पुन्हा पुन्हा सांगणं हे ही बरोबर नाही. तुला आवडेल, ना आवडेल, तुला काय वाटेल, काय वाटत असेल, ही भीती पण असतेच ना गं.!
#आयुष्य_वगैरे
#गंध_आठवणींचा