सरकारी नळ २३/०३/२०२३

तेव्हा घरटी शौचालयं ही नव्हती आणि नळं ही नव्हते. मग कधी बोलावणं येईल तेव्हा टमरेल घेऊन, घराजवळच्या त्या शासकीय धान्य गोदामाच्या बाजूला असलेल्या, बाभळीच्या जंगलात आम्ही जाऊन बसायचो. सकाळ असो वा संध्याकाळ तिकडे टमरेल घेऊन एकटं तसं फारचं कमी जायचो. कारण तिकडं जायच्या आधी, हातात टमरेल घेऊन घराजवळच्या सगळ्या मित्रांच्या घराकडे जाऊन, ऐ.., येतो काय रे.? अशी हाक दिलेली असायची.! नाही.., मी मगाशीच जाऊन आलोय, असं म्हणूनही काही मित्र उगाच सोबत म्हणून यायचेच. मग तिथं बाभळीच्या झाडात जाऊन बसल्यावर, मूळ काम आवरलं असलं तरी, हातात एखादा काडीचा तुकडा घेऊन जमीनीवर काहीतरी गिरगटणं सुरू असायचं. तिथं आमची शाळेतल्या, गल्लीतल्या अशा भरपूर गोष्टींवर खूप वेळ चर्चा व्हायची. संध्याकाळी शाळेतून आल्यावरही, अंधार पडायच्या आधी हाच पॅटर्न पुन्हा एकदा राबवला जायचा. सरकारी नळावर पाण्यासाठी भांड्यांचा नेहमीच ढीग लागलेला असायचा. कधी सकाळी सकाळी एक दोन तास नळाला पाणी सुटायचं, तर कधी संध्याकाळी.! नळाला पाणी यायच्या अर्धा पाऊण तास आधी फक्त हवाच यायची. त्यावेळी शिट्टी वाजवल्यासारखा आवाज यायचा. प्रत्येक घरातलं एखादं म्हातारं माणूस त्या नळावर आणि तिथं बारीला ठेवलेल्या आपल्या भांड्यावर दिवसभर लक्ष ठेवून असायचं. नळाला पाणी आल्याचं दिसलं की प्रत्येक घरातील शक्य तितकी सगळी मंडळी हातात असतील ती कामं बाजूला ठेवून, सरकारी नळाकडे धाव घ्यायची. तू तर माझ्या मागून आली होती, मग तुझा नंबर माझ्या आधी कसा.? या एका वाक्याने तिथं नुसता धुमाकूळ घातलेला असायचा.  तिथं बाजूलाच पडलेली माती घेऊन, नारळाच्या केसांनी पाण्यासाठी आणलेली भांडी घासताना कित्येक बायकांच्या तोंडाचा पट्टा एकसारखा सुरूच असायचा. त्यात एखादी नुकतीच नांदायला आलेली नवी नवरी शांतपणे सगळं पाहत, ऐकत असायची. तेव्हा नकळत मनात येऊन जायचं की, खरंतर ही सुद्धा वादळापूर्वीची शांतता आहे. काही वर्षांनी हे वादळसुध्दा इथंच घोंगावणार आहे, धुमाकूळ घालणार आहे. तेव्हा वयानं जरी लहान असलो तरी, आजूबाजूला नेमकं काय चाललंय, हे थोडं थोडं लक्षात यायचंच. त्या नळावर तेवढ्या कालव्यातही, काही हसरं चेहरं नजरेला पडायचं. त्यांचं आई-बाप पाण्यासाठी भांडत असायचं, पण त्यांची वयात आलेली मुलं-मुली एकमेकांकडे पाहून लय म्हणजे लय गोड हसत असायचीत. तेव्हा मनात गुदगुल्या होऊन जायच्या. दो दिलsss मिल रहे हैंsss हे शाहरूखचं गाणं मनात वाजू लागायचं. हां.., या दोघांना तर आपण त्या तिथं बोलताना पाहिलं होतं, आणि अजूनही पाहतोय हे लक्षात यायचं. पण तिथं सुरू असलेल्या 'पाणीबाणीत', हे नजरेचे खेळ पाहणं लय मस्त वाटायचं. आता घरटी नळ कनेक्शन आल्यापासून गल्लीतला तो, दोन तोंडाचा सरकारी नळ बंद केला गेलाय. तरी अजूनही  त्याचे अवशेष तिथं बाकी आहेत, जे येता जाता सतत खुणावत असतात आणि आठवणींच्या गावाची सफर घडवून आणत असतात.! 🎭
#आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..