आठवणी शाळेतल्या..

आमची शाळा मारूतीच्या मंदिरामागे होती. शाळेला वेगळं मैदान असं नव्हतंच. आमची प्रार्थना, दैनंदिन परिपाठ आणि इतर सगळे कार्यक्रम वगैरे नेहमी मंदिराच्या परिसरातच व्हायचे. नंतर बहुतेक काही वर्षांनी, रस्त्याच्या पलीकडे असलेल्या रिक्षा स्टॉपच्या मागील, भाड्याने घेतलेल्या २ खोल्यांत ६वी, ७वी चे वर्ग भरायचे. जेवायच्या सुट्टीची बेल वाजली की आम्ही थेट मंदिराचा कट्टा गाठायचो, तर कधी आत मंदिरात बसायचो. आधीच जळलेल्या अगरबत्त्या आणि कापूर यांचा सुवास तिथं नेहमीच दरवळत असायचा. मारूतीच्या पायाशी वाहिलेली साखर घेऊन जाण्यासाठी मोठमोठ्या काळ्याकुट्ट मुंगळ्यांचा तिथं नेहमीच बाजार भरलेला असायचा. डबे उघडून आपापल्या भाज्या एकमेकांना वाटून झालं की आम्ही जेवायला सुरुवात करायचो. जेवताना नेहमीच नजर इकडं तिकडं भिरभिरत असायची. भिंतीवर लिहिलेलं भीमरूपी महारूद्रा... नकळतपणे वाचून काढलं जायचं. आमचं जेवण सुरू असताना मंदिरात मारूती भक्तांचा राबता सुरूच असायचा. अधूनमधून कानी येणारा घंटानाद मस्त वाटायचा. शाळेत पाण्याची सोय नव्हती, त्यामुळे जेवणं आवरलं की मग आम्ही पाणी प्यायला, आणि डबे धुवायला, मारूती मंदिराच्या आवारात असलेल्या विठ्ठल रखुमाई च्या मंदिरापाशी जायचो. कसं काय कुणास ठाऊक पण, कधी तिथं पाणी प्यायला आम्ही गेलोय आणि पाणी मिळालं नाही असं कधी झालंच नाही. मस्त वाटायचं. आम्ही पटापटा डबे धुवून, पुन्हा त्याच डब्यातून गटागटा भरपूर पाणी प्यायचो. काही क्षणातच मग एकवार एकवार ढेकर द्यायचो. मारूतीच्या मंदिराच्या अगदी समोर आणि बरोबर मध्यभागी एक भलं मोठं पिंपळाचं झाडं होतं. मग काही वेळ आम्ही तिथंच पडून रहायचो. बाजूच्या रस्त्याला नेहमीच खूप वर्दळ असायची. त्यामुळे कानावर एकसारखं गाड्यांच आवाज येतच असायचं. पण ते सगळं सवयीचं झाल्यानं त्रास अजिबात होत नसायचा. डोक्याखाली हात घेऊन आम्ही एकटक विशाल अशा पसरलेल्या पिंपळाला पाहत रहायचो. अधेमध्ये डोळे झाकून पाणांची ती सळसळ ऐकायला खूप मस्त वाटायचं. त्यातच अधेमधे घंटानाद ऐकू यायचा. खरंच.. ते काय मस्त दिवस होते शाळेचे.! 🎭


आयुष्य_वगैरे 

शाळेच्या_डायरीतलं_एक_पान

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..