प्रेम वगैरे..
Well settled आहे ती आता तिच्या आयुष्यात. आमची एवढी जुनी मैत्री आम्हाला काही दिवसांपूर्वीच नव्याने सापडली आहे. खूप खूप Thanks to तिलाच. त्यायोगे मग आता एकमेकांची विचारपूस सुरू असते अधेमधे. कधी कधी chatting तर कधी दोघांनाही आवडणारा आणि तिला मोकळा करणारा, तिला खूप खूप हसवणारा आमचा फोनवरचा संवाद. ती खूप खूप बडबडते. अगदी लहान मुलागत. त्यातल्या त्यात तिचं हसणं बाकी विषेशच वाटतं. पण बोलता बोलता सतत मला बुचकळ्यात पाडत असते. क्षणभर काय बोलावं कळतच नाही मला. आणि मग अशा वेळी मला निरूत्तर झालेलं पाहून पुन्हा हसायला लागते. मस्त वाटतं.
ती - हे प्रेम वगैरे मलाही खूप करू वाटायचं रे. कुणीतरी आपल्याला जीव लावावं, आपला एक boyfriend असावा, आपण त्याच्या हातात हात घालून फिरावं. पण पप्पांची मान खाली जाईल असं मला काहीच करायचं नव्हतं. So म्हणून मी कधीच त्या वाटेला गेली नाही.
आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? सांग ना रे मला. आता तुझंच उदाहरण घे ना. मी तुला इतकी का आवडायची आणि अजूनही आवडते. का बरं.? असं काय पाहिलंस माझ्यात.? कधी तुझ्याशी बोलले नाही, कधी आपला इतका काही परिचय सुद्धा नाही. तरीही का रे तू इतका माझ्या मागे लागला होतास.? सांग ना रे.
सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो?
तो - अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की.
ती - अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे?
तो - अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मला आवडतेस बस्स इतकच मला माहिती आहे. यापलिकडे मी काही सांगू शकत नाही.
ती - नाही. मला आज काय ते सांगच.
तो - अगं, असं कसं सांगू. माझं मलाच नेमकं काही माहिती नाही की मी तुला पहिल्यांदा कधी बघितलो. तू कधी मला आवडू लागली. आणि कधी हे लपून छपून बघणं सवयीचं होऊन गेलं. पण का कुणास ठाऊक तुला बघितलं की मस्त वाटायच. एवढं मात्र नक्की आठवतंय मला की आपण खूप लहान होतो ना, तेव्हा पासून तू मला आवडतेस. आजोबांचा हात धरून फिरणारी तू आणि तुझी बहिण भावंडं हे चित्र तर मनावर कायमचं कोरलं गेलंय. लहानपणी तुझे केस खूप मस्त वाटायचे. आत्ता आपल्या रिया राणीचे आहेत ना, अगदी सेम टू सेम तसेच काहीसे. लहानपणीचा तुझा तो खांद्यापर्यंतचा हेअर कट, कानातल्या त्या गोल गोल रिंगा, ते गोरे गोरे गुबगुबीत गाल, सतत इकडं तिकडं भिरभिरणारी नजर आणि आजोबांचा घट्ट धरलेला हात. हे सारं काही कधीच न विसरण्यासारखं आहे माझ्यासाठी. वय वाढत गेलं तसं आणखीन जास्तच जीव गुंतत चालला होता तुझ्यात.
ती - झालं. इतकंच. फक्त एवढ्यासाठीच आवडायची मी तुला.? म्हणजे अप्रत्यक्षपणे तू माझ्या दिसण्यावर प्रेम केलास.
तो - अरे बाबा, तसं काही नाही रे. मी कधीच तुझ्या दिसण्यावर प्रेम केलं नाही. का कुणास ठाऊक मला तू आवडायची आणि आवडतेस. बस्सं यापलीकडे मी काही सांगू शकत नाही.
मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस.
तुझा आवाज सुंदर आहे.
तू अतिशय काळजी घेणारी आहेस.
तू अतिशय प्रेमळ आहेस
तू विचारी आहेस.
तुझे हास्य मोहक आहे.
तूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.
आता तुझ्या मनाचं समाधान करायला हे असलं मी काहीही बोलू शकतो, पण मला हे पटत नाही. मला तर असं वाटतं की प्रेमाला कारणांची गरज नसते. बरोबर ना. म्हणूनच
मी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय. कोणत्याही कारणाशिवाय. तू आवडतेस. बस्सं. बाकी काही माहित नाय. तू समोर यायला लागली की माझी कायम फक्त आणि फक्त तुझ्या चेहऱ्यावरच खिळलेली असायची. सतत तुझ्या डोळ्यात बघण्याचा प्रयत्न करायचो, पण क्वचितच तू नजरेला नजर भिडवायची. त्यामुळे तुझ्या दिसण्यावर प्रेम केलंय किंवा कुठंतरी वासना होती माझ्या प्रेमात असं मला कधीच वाटलं नाही. पण तू आवडायची. तुला लपून छपून बघायला, मागं मागं फिरायला मस्त वाटायचं. एखाद्या दिवशी दिसली नाही की मग नाय करमायचं.
ती - हो रे. तसं काही नव्हतं तुझ्या मनात. माहितीये मला.
तो - अगं ऐक ना, अगदी थोडक्यात सांगू काय गं तुला.
खरे प्रेम नेहमी कायम रहाते. मग ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असो वा नसो. आणि जर फक्त वासना असेल ना त्या प्रेमात, तर कालांतराने ती वासना उडते आणि मग एकमेकांचा उबग येतो. प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत. मला लहानपणापासून असं कधीच वाटलं नाही की ही आपल्याला आवडते, म्हणजे ही आपल्यालाच मिळाली पाहिजे. कारण मनात कुठंतरी वाटायचं की आपण सुद्धा तिला आवडलो तरच या नात्याला अर्थ आहे. म्हणून सतत स्वतःला एका मर्यादेत ठेवलं. कधीच अतिरेक केला नाही. हां पण सतत मागं फिरणं, तुला एकटक बघणं यावर मला नियंत्रण ठेवता आलं नाही. कारण तो माझ्या दिनचर्येचा एक भागच झाला होता.
ती - तू बोलतो भारी रे.
तो - अगं यात काही विशेष नाही. सतत इकडं तिकडं काहीतरी वाचत असतो. त्यावर विचार करत असतो. मग सुचत जातं काहीतरी. आता एक सांगतो ऐक ना. हेसुद्धा कधीतरी कुठेतरी वाचलेलं आहे.
प्रेमाचे तीन प्रकार आहेत
१.प्रेम जे आकर्षणाने मिळते.
२.प्रेम जे सुख सुविधेमुळे मिळते.
३.दिव्य प्रेम.
जे प्रेम आकर्षणाने मिळते ते क्षणिक असते. कारण जसजसं नात्यातलं आकर्षण कमी होत जाते तसं ते प्रेम लोप पावते.
जे प्रेम सुख सुविधामुळे तयार होते त्यात त्यात जोश, उत्साह आणि आनंद नसतो. कारण पैसा आणि वैभव याने कधीच प्रेम वाढत नाही.
आणि या दोन्ही प्रेमांपेक्षा दिव्य प्रेम मस्त आहे. कारण ते नेहमीच सदाबहार, कायमच नाविन्याने भरलेले राहते. आपण अश्या प्रेमाच्या जितकं जवळ जातो तितकंच ते अधिक आकर्षक व गाढ होत जाते. याचा कधीही कंटाळा येणार नाही, उलट ते प्रत्येकाला उत्साही ठेवते. दिव्य प्रेम आकाशाप्रमाणे असतं. ज्याला कोणतीही सीमा नसते. दिव्य प्रेम कोणत्याही नाते-संबंधापेक्षा श्रेष्ठ आणि सर्व नाते-संबंधाना सामाऊन घेणारे असते.