अंगठा २५/०४/२०२३
राशनच्या दुकानासमोर कधीपासून लांबच्या लांब लाईन लागली होती. कुणाचा कुणाशी काही ताळमेळ नव्हता. काही मध्यमवयीन बाया कधीपासून एकमेकींशी वाद घालत उभ्या होत्या. त्या लाईनीत उभं राहू न शकणारी काही म्हातारीकोतारी माणसं, बुड टेकवून आपला नंबर येण्याची वाट पाहत बसली होती. त्यांना त्या वादावादीशी अथवा बाजूला काय चाललंय याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांचा अंगठा, आजतरी त्या मशीनीवर उठणार की नाही, या टेंशननं त्यांना घेरलं होतं. आत मापाडी मापं घालून घालून पार वैतागून गेला होता. या सा-या पासून अलिप्त असलेला सेल्समन, तोंडांत तंबाखूची चिमूट धरून, एकसारखा अंगठं लावून घेऊन पावत्या फाडून देत होता. अधेमधे कुणीतरी जाऊन सतत सेल्समनला सांगत होतं की, कृपया जरा बाहेर पडा, या गर्दीला आवरा, शिस्त लावा. पण सेल्समन काहीही न बोलता फक्त हातवारे करून, अंगठे घेऊन, पुन्हा पावत्या फाडून देण्यात हरवून जात होता. तितक्यात एक सुंदर तरुणी त्या राशनच्या लाईनीत येऊन उभी राहिली. तसा तिचा नंबर ब-यापैकी शेवटचाच होता. त्यामुळे ती अगदी चटकन् सा-यांच्या नजरेत येत होती. तिचं अस्तित्व जसजसं त्या गर्दीला जाणवू लागलं, तसतसं कुणास ठाऊक कसं काय, पण अचानक त्या गर्दीला शिस्त आली. कधीपासून सुरू असलेल्या कालव्याची जागा अचानक शांततेने घेतली. कधीपासून बोलावून ही बाहेर न येणारा सेल्समन स्वतःहून बाहेर आला, कारण त्यालाही प्रश्न पडला होता की एकदम इतकी शांतता कशी काय पसरली. मग एव्हाना त्यालाही सगळं लक्षात आलं. तो सुद्धा हसत जाऊन त्याच्या जागेवर बसला आणि त्या सुंदर तरूणीचा अंगठा लावायला नंबर येण्याची वाट पाहू लागला.! 🎭
#आयुष्य_वगैरे