जीवनगाणे

येणारा जाणार प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. एखाद्या दिवशी सारं काही मनासारखं घडतं असतं, तर एखाद्या दिवशी नेमकं याच्या उलट. पण तरीही प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण आनंदी असतोच. कारण दिवसभरात आपल्या नकळत आपल्या वाट्याला येणारे ते आनंदाचे क्षण.! खरंच., दररोज कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आपला संपूर्ण दिवस मजेत जायला कारणीभूत ठरलेल्या असतात. जरा विचार करा आणि आठवून बघा., म्हणजे सारं काही तुम्हाला उमगेल. दररोज सकाळचा पक्ष्यांचा किलबिलाट, घराच्या खिडकीतून तिरपी येणारी सुर्याची पहिली किरणं, गरमागरम चहाचा तो मदमस्त सुवास, शेजारून कुठंतरी भाकरी थापण्याचा येणारा आवाज, एखादा जठराग्नी पेटवणारा फोडणीचा दरवळ, आपण मनातल्या मनात गुणगुणत असलेलं आणि नेमकं त्याचवेळी tv, radioवर लागलेलं ते गाणं, घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपल्या बाळाने दिलेला एक गोड मुका, तिचा 'संध्याकाळी लवकर घरी या हं..' असा प्रेमळ हुकूम, मग पुन्हा प्रवासातली मजा, ओखळपाळख नसताना कुणीतरी दिलेलं स्माईल, कामाच्या ठिकाणी कितीतरी ताण असताना कुणीतरी अचानक केलेली एखादी मिश्किल टिप्पणी आणि त्यानंतर पिकलेला हशा, दुपारच्या वेळी टिफिन वाटताना एकमेकांच्या आया, बहिणी, बायका यांचं होणारं मनसोक्त कौतुक, सकाळी संध्याकाळी नेहमी अगदी हसतमुखाने येणारा आणि तितक्याच प्रेमाने चहा वाटणारा चहावाला, असे कितीतरी अनमोल क्षण नकळतपणे आपल्या वाट्याला येत असतात आणि आपल्याला सुखावून जात असतात. या अशा कित्येक छोट्या छोट्या गोष्टीवरच आपला सारा दिवस अवलंबून असतो. फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे किंवा लक्षात तरी आलं पाहिजे. बस्सं., आणि काय हवं.? बरोबर ना.!🎭

#आयुष्य_वगैरे 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..