ती आणि पाउस
तिला पाऊस आवडतो, खूप खूप आवडतो. तिच्या घराजवळ, अंगणात, शाळा कॉलेजातून येता जाताना संधी मिळाली की मनसोक्त भिजताना पाहिलंय मी. तिच्या आवडीचा पाऊस म्हणजे तो पावसाळ्याच्या आधीचा, तासभर धो धो पडणारा नव्हें हं., तर तिचा पाऊस म्हणजे पावसाळा.!! अलगद... हळूवार... एकसारख्या नुसत्या सरीवर सरी.!! तिच्या भावंडांबरोबर पावसात भिजताना एक दोनदा पाहिलंय मी तिला. तेव्हा वाटून जायचं की तिचं आणि पावसाचं बहुतेक खूप जुनं नातं आहे. तिला तसं पाहून वाटायचं की, पावसात भिजायला वय नसतं. पाऊस आणि तिचं नातं घट्ट आहे. कधी कधी ते तिच्या आवडीच्या गाण्याच्या लयीतून, तर कधी रिमझिम बरसणाऱ्या सरीतून, नकळत दिसून येतं.