वेड...!! २५/१२/२०२२

आत्ता कित्तीतरी वर्षे उलटली, पण अजूनही गल्लीतल्या 'त्या' रस्त्याची ओढ काही केल्या सुटत नाही. तसं तिकडं फारसं जाणं होतं नाही की मी टाळतो, ते सुद्धा कळत नाही. तेव्हा रात्री झोपताना डोक्यात घेऊन झोपलेल्या विचारानेच, सकाळी जागही यायची. सगळी आवराआवर ही आधीच ठरलेली असायची. मग मन तर आधीच त्या वाटेला गेलेलं असायचं, औपचारिकता म्हणून मग मीसुद्धा मनाच्या मागेमागे जायचो. माझ्या घरापासून अगदी छोटसच ते अंतर, पण त्या जागेची, त्या वाटेची इतकी ओढ कधी लागली, हे माझं मलाच अजूनही स्पष्ट आठवत नाही. मनाने असो वा शरीराने, उठसूट नुसतं तिथंच रेंगाळत रहायचं. गल्लीतला तो भला मोठा चौक, तिथं नेहमीच असलेला चिल्ली-पिल्ली, म्हातारी कोतारी यांचा राबता, ते भाभींच छोटंसं दुकान, त्याचा छोटासा कट्टा, कोपऱ्यावरच्या एका दर्ग्यातलं, ते एक भलं मोठ्ठं चिंचेचं झाड, सतत शिव्या देणा-या पण तितक्याच प्रेमळ अशा त्या आऊ मावशी, बोळाच्या तोंडा शेजारीच असणारं त्यांच ते घर, ज्याच्यावर बसून बेरंग जीवनात रंग भरायची स्वप्नं पाहिली होती, मनातल्या मनात कित्येक गाणी गायली होती, तो बरीच वर्षे पडून असलेला तो BSNLचा खांब. अगदी तेव्हापासूनच  मनावर 'तिची' हुकूमत होती, पण शरीरावर आईची 'सत्ता' चालायची, दररोज सकाळी आंघोळीनंतर आईनं माझ्या डोक्यावर खोबरेलचा डबा उलटा केलेला असायाच, एका साईडला भांग पाडलेला असायचा, त्या तेलानं दिवसभर थोबाड तेलकट, म्हणून थोबाडावर ढिगभर पावडर थापून, मनाच्या रेल्वेलाईनवर सुसाट धावणा-या, तिला पाहण्याच्या ओढीची गाडी ताब्यात ठेवण्याची ती माझी धडपड, खूप दूरच्या कोपऱ्यावर, ती अंधूकशी दिसू लागल्यावर वाढलेली ती ह्रदयाची धडधड, ती हळूहळू जवळून जात असताना, माझ्यावर पडणारी तिची ती चोरटी, पण तितकीच रागीट अशी वाटणारी नजर, ती तिथून गेल्यावर ही, माझं तिथंच रेंगाळत राहणं, आता ती पुन्हा कधी घरी परतणार.? यावर पुढील सगळं वेळापत्रक ठरवणं..!! हे सारं काही मनात खोलवर जपलयं, या सा-यालाच आयुष्यानं #सर्वस्व मानलयं. बहुतेक तेव्हाच माझं ते वयच कारणीभूत आहे याला, म्हणूनच हे #वेड मी जगलयं.., जपलयं.!🎭
#आयुष्य_वगैरे
#त्याच्या_मनातलं

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..