तांदूळ..
रेशनिंगच्या तांदळाचा मोह काही केल्या सुटत नाही. ते मोठे मोठे थोडेफार पांढरे-काळपट शिजल्यानंतर फुगीर दिसणारे दाणे, त्यात शिजवताना टाकलेले मुगाच्या वा तुरीच्या डाळीचे काही दाणे.!! आहाहा... कमालीची लाजवाब चव..! कितीही महागडा तांदूळ आणून खाल्ला तरीही, जेवणाच्या शेवटी रेशनिंगच्या तांदळाच्या भाताचे दोन घास खाल्ल्याशिवाय, जेवणं परिपुर्ण वाटतच नाही. रेशनिंगच्या धान्याची ही ओढ तशी जुनीच आहे. बालपणी रेशन दुकानाच्या लाईनीत थांबण्यापासूनच ती नसानसांत भिनलीय. आता रेशनकार्डावर रॉकेल तेल मिळायचं बंद झालं असलं तरी, आजन्म त्या रॉकेल तेलाचा वास कधीही विसरणार नाही, कारण तेव्हा पाच-सात लिटर रॉकेल तेल मिळालं तरी, निदान आठ पंधरा दिवस तरी आईचा स्वंयपाक करतानाच त्रास कमी व्हायचा. तिची कामं वेळेत व्हायची. स्टोव्ह पेटवताना आवळलेली ती चावी, मग त्यात भरलेली ती हवा, नंतर बर्नर मधून रॉकेल बाहेर येण्यासाठी केलेली पिन, आणि लगेचच काडी पेटवताच स्टोव्हचा येणारा तो भप्प असा आवाज. अजूनही नुसतं आठवलं तरी सगळं काही जसच्या तसं नजरेसमोर उभं राहतं.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#गंध_आठवणींचा