पारिजातक
तुला तर माहीतच आहे, तुझी आठवण येत नाही असं काही नाही. आणि तू नेहमी म्हणतेस त्याप्रमाणे आठवण त्यांची काढावी लागते, ज्यांना आपण विसरलेलो असतो. आणि मी तुला विसरणं तर शक्यच नाही गं. आता आजही असंच काहीसं झालं. तुला सांगू आज काय झालं.?
ऑफिसहून आल्यानंतर नेहमीसारखाच फ्रेश होऊन अंगणात बसलो होतो. मस्त पावसाळी आकाश सजलं होतं. गार वारा सुटला होता. मोबाईल चार्जिंग ला लावला असल्याने आजूबाजूला हे सारं काही पाहता येतं होतं. जवळपास साडेसहा वाजून गेले होते. तितक्यात सहजच मनात विचार येऊन गेला, तू आणि चिमणी आत्ता काय करत असाल.? मग अचानकच वा-याचा वेग वाढला. अंगावर अचानक तुझ्या आठवणींचा शहारा आला. पलीकडच्या कोपऱ्यातलं पारिजातकाचं झाडं आनंदाने बागडू लागलं. त्याच्या पानांची ती सळसळ ऐकून मला क्षणभर असं वाटलं की, तू बहुतेक इथेच कुठेतरी माझ्या आसपास आहेस. मी आसपास नजर फिरवली, पण तो मात्र भास होता. मग बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर पारिजातकाचा मनमोहक सडा पडला. माझ्या प्रत्येक श्वासात अचानक तुझ्या आठवणींचा सुवास, तो गुंफून गेला. मी डोळे गच्च मिटून घेतले आणि त्या दिवशीची, तुझी ती पारिजातकाच्या फुलांनी भरलेली ओंजळ पाहण्यात हरवून गेलो. हळूहळू पाऊस वाढत गेला. पावसाचे मोठमोठाले थेंब शरीरावरून ओघळू लागले, तसा मी भानावर आलो. पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाण्याच्या तयारीत असलेली, कोप-यात बसून माझ्याकडे पाहणारी ती फुलं अलगद उचलून ओंजळीत घेऊन मी आत आलो, पुन्हा एकदा तो सुवास श्वासात भरून घेतला आणि पुन्हा पावसात मनसोक्त, चिंब चिंब भिजणा-या त्या आठवणीतल्या पारिजातकाला न्याहाळत बसलो.🎭
#आयुष्य_वगैरे
#गंध_आठवणींचा 🌼🌼