सोयाबीन....! ०९/१०/२०२२

या दिवसात एव्हाना सोयाबिनची काढणी आणि मळणी झालेली असायची. तरीही बाजारात नेऊन विकण्याआधी थोडंसं उन खायला सोयाबीन अंगणभर पसरलेलं असायचं. गाढव आणि उडंग्यावनी फिरणारी जनावरं यांनी सोयाबिनात तोंड मारू नये, म्हणून मी, भाऊ आणि शेजारची मित्र यांना शाळेतून परतल्यावर दिवसभर सोयाबीन राखणीचं काम असायचं. आई बा अन् आज्जा शेताकडे गेलेलं असायचं. दिवाळी तोंडावर आलेली असायची. बा मिलमधलं काम बघून शेती बघायचा. त्याची लय वढाताण व्हायची, पण उधारी उसनवारी करून कसतरी तो घर चालवायचाच. हफ्त्याभरानं हळूहळू सोयाबीन बाजारात घेऊन जायचं. ते इकून पैला उधारी भागवायची. मग उरलेला पैसा प्रपंचाला लावायचा. तरीही कमी पडायचचं. पण तरीही आम्हा भावंडांची सगळी हौस व्हायची. मग एखादी दिवाळी आईबाची नव्या कपड्याविनाच जायची. एखादं जुनं पाताळ आई सणाला मिरवायची. बा सुद्धा एखादा जुनाच कडक ड्रेस इस्त्री मारून वापरायचा.! मळणी करताना त्यात मातीच तुकडं जास्त आहेत म्हणून बाजूला काढलेलं एखादं तोंड बांधून ठेवलेलं सोयाबिनचं पोत तसंच पडलेलं असायचं. दिवाळ सणानंतर त्याला जमेल तसं निवडून, साफ करून, ते बाजारात नेऊन इकून पुन्हा बरेच दिवस संसारगाडा आईबाला चालवायचा होता.🎭
#आयुष्य_वगैरे 
#त्याच्या_मनातलं 
#सोयाबीन

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..