आठवणी शाळेतल्या...
शाळा घरापासून जवळच होती. शाळेच्या मागे एकूण तीन डांबरी सडक होत्या. त्यातली एक आमच्या शेताकडे ही जायची. तिथं एक रेल्वे फाटक ही आडवं यायचं. कधी कधी नेमकं फाटक लागायचं. पप्पा, आई आणि मी मग उशीरापर्यंत तिथंच उभं रहायचो. तिथून जवळचं मोठा नाला नेहमी वाहता असायचा. त्याचा उग्र घाण वास एकसारखा नाकात अतिक्रमण करत असायचा. रेल्वे तशी खूप लांब असायची, पण ती यायच्या पाच दहा मिनिटे आधीच फाटक बंद झालेलं असायचं. नंतर मग हळूहळू आवाज येऊ लागायचा. स्टेशन जवळ आलयं म्हणून तिचा वेग कमी झालेला असायचा. मी रेल्वेचे डबे मोजण्यात मग्न असायचो. तितक्या वेळात पप्पांनी एक सिगारेट सुलगावलेली असायची. आईला हे आवडत नसल्यानं ती कधीच लांब जाऊन थांबलेली असायची. एकदाची रेल्वे निघून गेली की मग हळूहळू ते फाटक वर जायचं. गडबडीत असलेली सगळी गर्दी इकडून तिकडे तिकडून इकडे जाईपर्यंत आम्ही एका बाजूला उभे राहायचो. सगळी गर्दी पांगल्यावर मग सर्वात आधी पप्पा सायकलवर बसायचं, त्यानंतर पुढच्या आडव्या नळीवर मी आणि आई मागं कॅरेजवर बसायची. तिला तिचा पदर ही सावरायचा असायचा आणि हातात जेवणाचा डबा ही अगदी गच्च पकडून बसावं लागायचं. रस्त्याची एक बाजू पकडून आम्ही हळूहळू शेताकडे जात असायचो. सायकलच्या चाकाच्या तारात अडकवलेल्या मण्यांचा आवाज बारीक आवाजात आमच्या प्रवासाला कोरस देत असायचा. आमचं शेत डांबरी सडके पासूनही जवळपास एक किलोमीटर आत होतं. तिथं गेल्यावर मी आणि आई खाली उतरायचो, मग त्या बारीकशा पायवाटेने पप्पा सायकल चालवत आत जायचे. मग चालत चालत आई पुढे पुढे, आणि मी मागे मागे. आम्ही आमच्या शेताच्या बांधावर पोहचेपर्यंत पप्पा आधीच जाऊन थांबलेलं असायचं. तेव्हा पाण्याची काही सोय नव्हती. सगळं काही मायबाप पावसावर अवलंबून. मी आणि आई कधीचे मागं जाऊन थांबलोय, तरी पप्पा एकसारखं टक लावून त्या आमच्या वावराकडं आणि वर आभाळाकडं पाहत असायचे.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#त्याच्या_मनातलं