शाळेतल्या आठवणी... २८/०५/२०२२

काल खूप वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत जाण्याचा योग आला. जुने दिवस आठवले. भरपूर वेळ शाळेच्या कट्ट्यावर बसून जे जे आठवतील ते प्रसंग पुन्हा जगत होतो. शाळेच्या आवारात फिरताना नजर सतत आजूबाजूला लिहिलेल्या सुविचारांवर जात होती. ते वाचत वाचतच सगळीकडे फिरलो. अधेमधे भिंतीवर दिसणारी महापुरुषांची चित्रं पाहून खूप मस्त वाटत होतं. हा इथं आपण अमुक इयत्तेत होतो, इथं अमुक इयत्तेत. या ठिकाणी बसून आपण नेहमीच डबा खायचो, इथं खेळायचो, प्रार्थनेच्या वेळी उभं रहायची ही आपली ठरलेली जागा, कवायत प्रकार करताना साथीला वाजणारं ते ढोलताशाचं संगीत, दररोज सकाळी मंदिरात होणा-या आरतीचा घंटानाद, दररोज सकाळी सकाळी मिळणारं ते चवदार सुगंधी दूध, इथं साचणा-या पावसाच्या पाण्यात आपण नेहमीच धिंगाणा घालायचो, शाळेत जाताना सर्वांनी चप्पला काढायची ती ठरलेली जागा आणि शाळा सुटल्यावर एकमेकांच्या चप्पला विस्कटून होणारा गोंधळ, असलं भरपूर भरपूर काही आठवत होतं.!! हे सारं  मनातल्या मनात आठवत आणि गालातल्या गालात हसत माझं फिरणं सुरूच होतं. नंतर हळूहळू पावलं वर्गाकडे वळली. वर्गात पाऊल टाकताक्षणी पहिल्यांदा कानात आवाज घुमला तो "एक साथ नमस्ते.!!" या वाक्याचा. प्रत्येक तासाला  गुरूजी वर्गात आले की हे ठरलेलं असायचं आणि ते ही अगदी एकदम जोशात. बाकड्यावरनं, भिंतीवरनं हात फिरवत मी बसलेला प्रत्येक वर्ग फिरलो. तिथल्या भिंती आणि बाकडे जरी आता जुने झाली असली तरी त्या आठवणी अजूनही तशाच ताज्या टवटवीत होत्या आणि आहेतही. भिंतीवर, बाकड्यावर आम्ही आणि आमच्या नंतरच्या व  आधीच्या विद्यार्थ्यांनी केलेली बरीच कलाकुसर अजूनही दिसत होती. बऱ्याच जणांच्या प्रेमकाहान्यांची साक्ष त्या वर्गाच्या भिंती आणि बाक अजूनही देत होत्या. कुठं बदामात तिच्या अन् त्याच्या नावाची आद्याक्षरं तर कुठं अगदी बिनधास्त त्याचं आणि तिचं पुर्ण नाव, बदामात.!! हे सारं काही मी मनात साठवत असताना, अधेमध्ये शाळेची तास बदलल्याची घंटा वाजल्याचा भास मला सतत होत होता.! पुन्हा कधी यायला जमेल ते माहीत नव्हतं म्हणून मग आठवण म्हणून थोडे फोटो काढून आवडत्या शाळेच्या स्वप्नमयी दुनियेच्या आवारातून बाहेर पडून 'दुनियादारी'च्या जगात आलो.!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..