#जुन्या_आठवणी

पुढला दिवस सुट्टीचा असला की आदल्या रात्री कधी कधी मुद्दामहून दोन चार जास्त भाक-या बडवल्या जातात. नाश्त्याला नेहमीच तेच ते उप्पीट पोहे खाऊन कंटाळा आला असला की, हा असा बेत ठरलेला असतो. मग त्या कांद्याने तेलात उडी मारल्या मारल्या घरभर पसरलेल्या सुवासाने पोटं पार खवळून जातात. कुणी याला तुकडं म्हणतं, तर कुणी भाकरीचं पोहे म्हणतं, पण जीभेचे असे चोचले पुरवायला खरंच बाकी कशानेही सर येत नाही. मस्तपैकी कांदा टोमॅटो, बाकी किरकोळ मसाले आणि वरतून थोडी कोथिंबीर पेरली की बस्स. थोडं ओलसर हवं असेल तर पाण्याचा किंचित शिडकावा, अथवा नुसतं वाफेवर ही काम होवून जात. अगदी असंच आदल्या रात्रीची एखादी भाजी शिल्लक असेल तर ती सुध्दा भाकरीच्या पिठात मिसळून, अगदी भाकरीप्रमाणेच थापटलेला, पण खरपूस भाजलेला एखादा #धपाटा सोबतीला थोडं दही आणि खर्डाही स्वर्गसुखाचा अनुभव देऊन जातो.! बहुतेक #जुन्या आठवणी ही अशाच असतात, फक्त अधेमध्ये त्यांना नव्याने #फोडणी देत जायचं असतं.! 
#आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..