हुंदका....! २४/०९/२०२२

तसं पहायला गेलं तर व्हिडिओ कॉलद्वारे अधेमध्ये त्यांची डिजिटल भेट सतत होत असते, तरीही प्रत्यक्ष भेटीची ओढ कधीच कमी होत नाही. अशावेळी थोड्या गप्पा टप्पा, कधी हलका फुलका विनोद, कधी पिठात माखलेले हात, तर कधी उकळी मारणारा चहा.,अशी किचनमध्ये तिची सुरू असलेली लुडबूड त्याच्या नजरेला पडायची. कधी कधी काहीही विषय नसताना ते तासनतास बोलायचे., अशावेळी त्याच्या अन् तिच्या चेहऱ्यावर एकसारखं, अविरत, एक हलकसं हसू, त्यांचं बोलणं संपेपर्यंतच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कायम असायचं. वर्षातून एकदा दोनदा कधीतरी मग त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग यायचा. दोन पाच मिनिटांचीच असायची ती भेट वगैरे. इथं पण तीच एकसारखी बोलायची, तो टक लावून तिच्याकडे पाहत असायचा. ती नजरेला नजर देणं टाळायची, सतत आजूबाजूला पाहत असायची, अधेमध्ये लाजून मस्त हसायची. हाणला पाहिजे तुला.., इतका टक लावून काय बघतो रे.?? तिचं हे बोलणं ऐकून तो हसून विषय टाळायचा. मग ती परतीच्या वाटेवरती निघाली की का कुणास ठाऊक, पण त्यांच डोळं अचानक भरून यायचं, भर गर्दीत, शेकडो माणसांत हुंदका दाटून यायचा, तिथं त्या गर्दीत हे सारं लपवणं त्याला खूप जड जायचं. त्याच्या पासून लांब जाणा-या तिला, हे कधीच लक्षात आलेलं असायचं. तरीही ती तशीच हसतमुखाने निघून जायची. अखेरीस तिची ट्रेन सुटली की, तिला बाय करण्यासाठी नकळतपणे वर चाललेला हात, अचानक मध्येच अडवून, मुठी आवळून, तो पट्कन मागे फिरून आडोसा गाठायचा, आणि इतका वेळ अडवून ठेवलेल्या हुंदक्याला वाट करून द्यायचा.🌼

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..