वेड २७/०४/२०२३
माझा वेडेपणा बहुतेक आता लयच वाढत चाललाय, कालही तू स्वप्नात आली होतीस. अॉफिसला सलग सुट्टया असल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून मी तुझ्या गावी मुक्काम ठोकून होतो. दररोज अर्धा पाऊण तासाने तुझ्या सोसायटीच्या समोर फिरत होतो, आणि नेमकं काल मग योग जुळून आला. मी तुझ्या सोसायटीच्या गेटबाहेर थांबलो होतो. तिथून तुमची लिफ्ट माझ्या नजरेला दिसत होती. त्या दिवशी तुमच्या सोसायटीकडे तो माझा चौथा फेरा होता. संध्याकाळची वेळ होती. बहुतेक आजही तू दिसणार नाही, म्हणून मी रूमवर परतणार होतो, तितक्यात लिफ्टचा दरवाजा उघडल्याचं मी पाहिलं. पाहतो तर काय, चक्क तू सोसायटी बाहेर येत होतीस. सोबत एक चिमुकली होती, पण ती आपली चिमणी वाटत नव्हती. तू बाहेर आल्या आल्या मला पाहून अगदी आश्चर्यचकित झालीस. आधी काय बोलावं, ते तुला सुचलचं नाही. तू नजरेनेच मला खुणावून पुढे निघून गेलीस. मग मी तुझ्या मागे मागे चालू लागलो. थोडं अंतर गेल्यावर, तू मला तुझ्या सोबत चालण्यासाठी पुढे बोलावून घेतलसं. तेव्हा माझ्याशी बोलताना आणि माझ्याकडे बघताना तुझा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला होता. कित्ती कित्ती गोड हसत होतीस तू, आणि लाजत ही कित्ती कमाल होतीस. तू जाम वेडा आहेस रे, एक फोनतरी करायचा की, मी इथं आलो आहे म्हणून. समज, मी जर आठवडाभर सोसायटी बाहेर आलेच नसते, तर तू तुझ्या गावी तसाच परतला असतास काय.? असे एक ना अनेक प्रश्न तू मला विचारत होतीस. मी मात्र तुला डोळे भरून पाहण्यात हरवलेला. तुझे ओठ हलताना मला दिसत होते, पण एकही शब्द माझ्या कानापर्यंत येत नव्हता. तितक्यात तुला जिथं जायचं होतं, तिथंपर्यंत आपण पोहचलो होतो. जवळच्या एका icecream Parlour ला तू आली होतीस. ती चिमुकली खूप रडत होती, आणि तिच्या आईने, तिला तुझ्या घरी सोडल्यामुळे, तिची आई परतेपर्यत तिला शांत करणं, काळजी घेणं, हे तुझ्याकडे होतं. म्हणून तू सोसायटी बाहेर आली होतीस, आणि मला देव पावला होता. कारण तू मला दिसली होतीस. त्या चिमुकलीने तिथंच बसून icecream खाल्लं. तेवढ्या वेळात आपण दोघेही खूप उशीरापर्यंत एकमेकांच्या समोर बसून होतो. तू तुझा तो नेहमीचा आवडता ब्लॅक जॅकेट घातला होतास. अगदीच काहीही न आवरलेली, साधीसुधी, पण कित्ती छान दिसत होतीस तू, मी एकटक तुझ्याकडे पाहत होतो, तू माझ्या नजरेला नजर देत नव्हतीस, पण आज तू मला काही बोलत सुद्धा नव्हतीस. असाच भरपूर वेळ निघून गेला. शेवटी त्या चिमुरडीच्या आवाजाने आपण भानावर आलो. तू पुन्हा तुझ्या सोसायटीची वाट धरलीस, आणि मला सांगितलंस की, माझ्या मागे मागे सोसायटी पर्यंत आलास तरी चालेल, पण थोडं अंतर ठेवून चालं. ओके. इतकं बोलून तू माझ्यापुढे चालू लागलीस, मी सोसायटी पर्यंत तुझ्या मागे मागे आलो, तू मला दिसशील तिथपर्यंत, म्हणजे लिफ्टचा दरवाजा बंद होईपर्यंत, मी तुलाच पाहत होतो.
हो स्वप्नच होतं हे, पण खूप मस्त वाटलं.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#त्याच्या_मनातलं