त्याच्या_मनातलं
आज अचानकच हवेत उकाडा खूप वाढला होता. शरीराची लाही लाही होत होती. आणि अशातच आज कामानिमित्त मला अॉफिस सोडून बाहेर यायला लागलं होतं. तासाभरात काम आवरल्यानंतर मी बसची वाट पाहत थांबलो होतो. डेपोत फोन लावून चौकशी केली होती. बस यायला अजुन बराच वेळ होता. उन्हाच्या तडाख्याने तिथं थांबण नको नको झालं होतं. म्हणून मग जीवाला जरा गारवा वाटावा म्हणून बाजूच्या दुकानावर जाऊन ग्लासभर ऊसाचा रस पिऊन आलो. तितक्यात लांबून कुणीतरी मला हाक देत माझ्याकडे येत असल्याचं मला दिसलं. हो, अगदी बरोबर. तोच होता. आज खूप दिवसांनी आमची भेट झाली होती. बाकड्यावर थोडीशी
जागा झाली होती, तिथं आम्ही दोघं अॅडजस्ट करून बसलो. अजूनही बस आली नव्हतीच. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तितक्यात त्याच्या हाताचे तळवे पाहत त्याने मला विचारलं. मित्रा., तुझा या हातांच्या रेषांवर विश्वास आहे काय रे.? मी त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केलं आणि गप्प बसलो. तो ही माझ्याकडे पाहून मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला की., "एकमेकांचे हात हातात घ्यायचा योग कधी आला नाही, पण एकदा तिच्या हातावर काढलेली मेहंदी दाखवताना गंमतीने एकमेकांच्या हाताचे फोटो आम्ही एकमेकांसोबत शेअर केले होते. तेव्हा माझ्या हाताच्या रेषा पाहून ती सहज बोलून गेली होती की., अरे, किती वेगळा आहे तुझा हात. अशा रेषा निदान मी तरी आजपर्यंत पाहिलेल्या नाहीत रे. आणि तेव्हा तिचं ते बोलणं ऐकून मी मनातल्या मनात विचार करत होतो की, बरोबरच तर बोलते आहे ती. बहुतेक म्हणूनच तर ती माझ्या नाही, तर आणखीन कुणाच्या तरी आयुष्यात आहे." त्याच हे
बोलणं ऐकून मी पुढं काहीतरी बोलणार तितक्यात बस आली. आमचं बोलणं पुन्हा एकदा अधुरं राहिलं. आधीच उन्हाने वैतागलेला मी पटकन बसमध्ये चढून खिडकीजवळची जागा पकडून बसलो. तो तिथंच बाकड्यावर बसून, अजूनही त्याच्या हाताच्या रेषांकडे पाहत होता.
#त्याच्या_मनातलं
#आयुष्य_वगैरे