कुटुंब १६/०५/२०२३
माझं शिक्षण तसं जेमतेम. शिक्षण सुटलं तसं छोटी मोठी कामे करू लागलो. कामही शिक्षणाच्या मानानं मिळायचं, पण कधी मागं हटलो नाही. हळूहळू २ नंबर वाल्यांशी संपर्क वाढत गेला. तेव्हा माझं वय १५-१६ असेल. चंदनाची तस्करी करू लागलो. भरपूर चांगला पैसा मिळवू लागलो. सन १९७८-८० च्या आसपास एका दाढीवाल्याच्या मदतीने एकटाक सहा गुंठे जमीन घेतली. नंतर पुन्हा काही दिवसांनी ७ गुंठे घेतली. मग काही वर्षांनी गावात एक तीन खोल्यांच तयार घरही विकत घेतलं. पैसा आणि स्थावर मालमत्ता आता भरपूर जमविली होती. मध्यंतरी माझं लग्नही झालं होतं. एक मुलगा आणि एक गोंडस मुलगी. पण त्यांना आजी आजोबा यांच प्रेम काही जास्त लाभलं नाही. माझ्या लेकरांचा जन्म झाला आणि एकाच वर्षात आई वडील दोघांनीही माझी साथ सोडली. वर्षामागून वर्षे जात होती. पोरगं चांगलं शिकून इंजिनिअर झालं. त्याला पन्नास साठ हजार रुपये पगार. पोरगी बी.कॉम करून आता सुखाने नांदत होती. पण जसं माझ्या पोराचं लग्न झालं, तसं अचानकच माझ्या बायकोनं अंथरूण धरलं. सतत औषधपाणी सुरू होतं. ती नांदायला आल्यापासून मी तिला काहीच कमी पडू दिलं नव्हतं. कॅन्सर असल्याचे निष्पन्न झालं होतं. कशाला दवाखान्याच्या खर्चात पडतोय रं, असं पाहुणे राऊळे म्हणत होते. अशीही ती मरणारच आहे, मरू दे ना. घरी घेऊन जा आणि दवापाणी कर, बस्स.! पण हे काही माझ्या मनाला पटत नव्हतं. तिच्या दवापाण्याला एकही रूपया कमी पडायला नको, म्हणून मी तिच्यासाठी थोडथोडं खरेदी केलेलं ५० तोळं सोनं एकटाक विकलं. त्यातून जवळपास ३७ हजार रुपये आले. पण तरीही ती मला सोडून गेलीच, शेवटी नियतीपुढे आपलं काहीच चालत नाही हेच खरं. आपण फक्त प्रयत्न करायचे.! या सा-या खटाटोपात पोटचं पोरगं ही बेरकी निघालं. तो इंजिनिअर आणि मी चार बुकं शिकलेला. मी बायकोच्या दवाखान्याच्या व्यापात असताना, तो सांगेल तिथं मी अंगठा उठवत गेलो, आणि तिथंच फसलो. पोरानं सगळं काही आपल्या नावावर करून घेतलं. एकुलती एक पोरगी तरी मला बघेल असं वाटत होतं, पण ती तर माझ्या बायकोचं तेरावं करून गेल्यापासून फिरकली सुद्धा नाही. आता दीड वर्ष उलटली या गोष्टीला. आता मी दिवसभर एक रिक्षा घेऊन फिरतो. तसं आता रिक्षाबी लय झाल्यात म्हणा, त्यामुळे भाडं तसं कमीच होतं. मालकाला ठरलेले पैसे देऊन, उरतील त्या पैशात पोट भरतं हेच काय ते सुख. पण जिथून सुरूवात केली होती, ते जुनं घर मात्र अजूनही आहे सोबतीला, आणि माझ्या बायकोच्या आठवणी. पण का कुणास ठाऊक अधेमध्ये आई-बाप खूप आठवतात.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ