०४/०४/२०२३
उन्हाचा ताव आता वाढतच चालला आहे. विहिरीवरची ब-यापैकी सगळीच झाडं, छोट्या छोट्या हिरव्यागार कै-यांनी भरून गेली आहेत. तिथल्या एकमेव अन् विशाल अशा चिंचेच्या झाडावर नेहमीप्रमाणे छोट्या-मोठ्या पक्षांचा बाजार भरला आहे. नाना जाऊन आता बहुतेक दोन तीन महिने उलटून गेले. अंगणातल्या एकुलत्या एका खुर्चीवर आता मावशी बसलेली असते. तिला संधीवाताचा त्रास आहे, त्यामुळे एकदा का एका जागी बसली की मग लवकर उठत नाही तिथून. भरपूर वेळ तिथंच असते ती आता. दररोजच तेच ते जगणं, पण आता ते आपलं माणूस आपल्यात नाहीये, ही जाणीव कित्ती भयानक ना. प्रत्येक दिवशी कित्तीतरी वेळा, तिला नानांनी हाक मारल्याचे भास होत असतील ना. 🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ