आठवणींचा पाऊस..! ०९/१०/२०२२

आज खूप दिवसांनी त्याची भेट झाली. मध्यंतरी बराच काळ लोटल्याने, मला त्याला ओळखणं जड जात होतं. डोक्यावर आणि गालावर पांढ-या केसांच अतिक्रमण आता खूपच जास्त दिसून येत होतं, प्रत्येक भेटीगणिक हळूहळू कमी येणारं त्याच हसू मात्र प्रकर्षानं जाणवत होत. आजही तो थोडासा निराशच दिसत होता. नेहमीप्रमाणेच चहाच्या टपरीवर आम्ही बसलो होतो. मी काहीच बोलत नव्हतो, त्याला एकटक पाहत होतो. तितक्यात चहाच्या पहिल्या घोटाबरोबर तो बोलता झाला. दोन तीन दिवस झालं., आई खूप धडपडतीये रे., पप्पांना बोलल्यागत करते, पण नकळत मलाच बोलतेय असं वाटतं. सतत म्हणत असते की, अहो., ऐकलंत का.? आपण आधी राहत होतो ना., त्या गल्लीत कुणीतरी वारलयं हो. पप्पा ऐकूनही न ऐकल्यासारखं तसंच बसून रहायचं., एकसारखं टक लावून खिडकीतून बाहेर पाहण्यात मग्न. त्यांना तसं पाहून मग आई चिडून काहीच न बोलता आपल्या कामाला लागायची. हे सारं मी ऐकलेलं असायचं. कुणाचं कोण वारलयं., हे मला चांगलंच ठाऊक आहे. आईला स्पष्ट बोलायचं आहे, पण ती बोलेना., कारण बहुतेक तिलाही माहीती आहे ना, की या साऱ्या चर्चेत ते नाव येणार आणि ते नाव म्हणजे माझ्या कित्ती जिव्हाळ्याचा विषय.,!! असो., हा विषय निघाला की मी तिथून निमूटपणे बाजूला होतो अथवा विषय टाळतो., पण कधी कधी आईच्या प्रश्नार्थक नजरेला, नजर द्यायची हिंमतच होत नाही रे.!! कित्ती झालं तरी आई आहे ना रे ती., सारं काही जाणते.!! त्याचं हे बोलणं मी ऐकतच होतो., फारतर दहाच मिनिटे झाली असतील. आकाशात काळ्याभोर ढगांची गर्दी वाढली होती. अधेमधे गडगडाट ही कानावर पडत होता. पुन्हा लवकरच भेटू., इतकं बोलून तो लगेचच झपझप पावलं टाकत निघून गेला., आणि थोड्याच वेळात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.!! 🎭
#आयुष्य_वगैरे
#त्याच्या_मनातलं

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..