श्वास
सगळे आप्तस्वकीय माझ्या आजूबाजूला जमलेत. त्यांची चलबिचल सुरू आहे. माझ्या एखाचा जिवलगाचा हुंदका दाटून आलेला आहे. आत स्वयंपाक खोलीत आल्या गेल्या पाहुण्यांचं चहापान करून वैतागलेल्यांचा विषय वेगळाच. आत नेमकं काय चाललंय, यापासून संपुर्णपणे अनभिज्ञ अशा बच्चे कंपनीने अंगणात धुमाकूळ घातला आहे. आणि या सगळ्या कोलाहलात, अगदी निपचित पडलेला माझा देह शेवटचे श्वास मोजतो आहे. शरीराची जराशी ही हालचाल नाही. फक्त छातीची हालचाल जाणवते आहे, ती पण फक्त आल्यागेल्या श्वासाचं प्रमाण म्हणून माझं तोंड एकसारखं सताड उघडं पडलं आहे. त्यात अधेमधे सतत कुणीतरी येऊन चमच्याने पाणी सोडत आहे, आणि मी विचार करत आहे की सगळं काही संपल्यात जमा आहे आता. किती तरी दिवसांपासून आपण असेच पडून आहोत. कुणी आलं, कुणी गेलं, कुणी काय बोललं, ते काहीच कळत नाही. जन्माला आल्यापासून जो सोबतीला आहे, अजूनही तोच सोबतीला आहे, माझा श्वास! आणि आता मी, तो कधी एकदाची माझी साथ सोडतोय, याची वाट पाहतो आहे.!
#आयुष्य_वगैरे #अडगळ