Date वगैरे... १६/०१/२०२३

का कुणास ठाऊक, पण आज त्याचा हट्ट होता की, मी त्याच्या सोबत कोर्टात आलंच पाहिजे. तासभराचच काम असेल, म्हणून मी सुद्धा वाट वाकडी करून गेलोच.
भयानक गर्दी.!! जवळपास सगळ्याच वयाचे चेहरे तिथं दिसत होते. पक्षकारांपेक्षा जास्त वकीलच वकील दिसत होते. तारीख पे तारीख काय असतं, आणि कधी कधी कोर्टात फक्त दहा मिनिटांच्या कामासाठी अखंड दिवस कसा घालवावा लागतो, ते सुद्धा अनुभवलं. पण जे पाहिलं वगैरे, त्या सगळ्याची सल मात्र कायम मनात घर करून राहणार, हे कुठंतरी सतत वाटत होतं. कामकाज आवरल्यावर आम्ही दोघं चहाच्या टपरीवर आलो. दुपारची वेळ सरून जायला लागली होती. हळूहळू हवेत गारठा जाणवू लागला होता. चहाचा वाफाळता कप समोर येऊन आता खूप उशीर झाला होता, पण काही केल्या आम्हां दोघांचा हात चहाच्या कपाकडे जात नव्हता. मनातलं वादळं त्यानं डोळ्यात अडवलं आहे, असं मला वाटतं होतं. त्याचा चेहरा निर्विकार दिसत होता, पण आत खोलवर धाय मोकलून रडणारं, एक लहान मूल, मला दिसत होतं. तितक्यात तो अचानक भानावर आला, एव्हाना थंड झालेला चहा, त्याने गटागटा पिऊन टाकला. मला कसं तरी होतंय रे., मी जातो घरी. पण पुन्हा भेटू तेव्हा नक्की बोलू., नेहमी कोर्टात एकटाच यायचो मी, पण आज तू सोबत होतास, फार बरं वाटलं मनाला.! इतकंच बोलून तो लगेच चालता झाला. मी फक्त होकारार्थी मान हलवली, कारण कोर्टातून बाहेर आल्यापासून तर जशी काही माझी वाचाच बसली होती. सकाळपासून जे काही पाहत होतो, आणि याला जितका ओळखत होतो, त्यावरून माझ्या मनात विचारांच तांडव सुरू झालं होतं...
"तिचा जीव, तिला नव-याकडून मिळणाऱ्या त्या चार पैशांत अडकलेला आहे, आणि त्याचा जीव अजूनही तिच्यातच गुंतून पडला आहे.!"  एके काळी याचे मित्र याला म्हणायचे की, वेड्या.., अरे बायको आहे ती, प्रेयसी नाही. बायकोवर कुणी इतकं प्रेम करतं का.? बायकोला कुणी इतका जीव लावतं का.? तेव्हा हा म्हणायचा की, मित्रांनो.., लग्नाच्या बायकोला जीव नाही लावायचा, तर मग कुणाला लावायचा रे.? आपल्या मनात इतकी वर्षे दाबून ठेवलेल्या प्रेमाच्या भावना, प्रेमाबद्दलची स्वप्नं, आपल्या पार्टनर बरोबर सेलिब्रेट करायची नाहीत, तर मग आणखी कुणासोबत साजरी करायची..?? सगळ्यांच्याच वाट्याला प्रेयसीचं सुख नसतं रे, पण जर मी बायकोमध्ये प्रेयसी शोधून, तिच्यावर प्रेयसीसारखचं प्रेम केलं, जीव लावला, तर त्यात गैर काय.? एकवेळ प्रेयसी सोडून जाईल रे, पण बायको तर कायमस्वरूपी माझी आहे ना, माझी लाईफ पार्टनर आहे ना. Dateवर जायला कुणाला आवडणार नाही.? बरोबर ना.! कधीच कुठल्याही मुलीसोबत डेटवर न गेलेला तो,
पण आता प्रत्येक महिन्याला, तिथं कोर्टाच्या आवारात, ती एक हवी नकोशी Date त्यांच्या वाट्याला येतेच. तो आधीपासूनच जरा वक्तशीर वगैरे, कोर्टाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच, दहा वीस मिनिटे हजर होऊन, तिची वाट पाहत बसलेला असतो. मग एखाद्या कोरड्या ढगाप्रमाणे ती येते, अगदी रूक्ष. ज्याच्या सोबत आपण आपल्या आयुष्याची, कडू गोड आठवणींनी भरलेली, काही वर्षे काढलीत, त्याच्याकडे तिने साधा एक कटाक्ष ही न टाकावा, याच दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. तो एखाद्या याचकाप्रमाणे, एकसारखा फक्त तिच्याकडेच पाहत असतो, पण सारं व्यर्थ.!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
#त्याच्या_मनातलं

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..