सदाफुली

माझी अन् त्याची भेट तशी नेहमी बाहेरच व्हायची, किंबहुना घडून यायची. मग कधी कधी बरेच दिवस तो भेटला नाही की, त्याच्या शोधात मी थेट त्याचं घर गाठायचो. तेव्हा त्याच्या भर वस्तीतल्या घराचा दरवाजा, मला नेहमीसारखाच बंद दिसायचा. अंगणात अगदी भिंतीला खेटून तीन नक्षीदार दगडावर विराजमान एक तुळस, पण नावालाच. कारण पाण्याअभावी ती कधीच पुर्णपणे सुकून गेलेली, फक्त सांगाडा शिल्लक. तेव्हा त्या तुळशीतल्या भेगाळलेल्या मातीला पाहत बराच वेळ मी तिथं रेंगाळत रहायचो. मला तसं पाहून आजूबाजूच्या लोकांच्या घरासमोरील तुळश्या हसल्याचा मला भास व्हायचा. आजूबाजूला अडगळीत उगवलेली सदाफुली ही मिश्कीलपणे हसल्या सारखं वाटायचं. दरवाजा ठोठावताच काही क्षणांतच तो यायचा. तेव्हा घराचा उंबरठा ओलांडून आत जाताना मनात सहज विचार येऊन जायचा की, या उंब-याला शेवटचं पाणी अन् हळदीकुंकवाची बोटं कधी लागली होती कुणास ठाऊक. 
त्याचं ते घर म्हणजे इनमिन तीन खोल्यांचे पत्र्याचे शेड. आजपासून बाहेरपर्यंत सगळ्याच चौकटी अगदी एकमेकांसमोर. किचन, बेडरूम, हॉल आणि बाथरूमच्या आसपास असलेली थोडी मोकळी जागा. त्या मोकळ्या जागेत, एका कोपऱ्यात, शेजारच्या अंगणात उगवलेल्या पारिजातकाची काही फुलं पडली होती, बहुतेक दररोजच पडत असावीत. त्यांना पाहून क्षणभरासाठी मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. तितक्यात त्याची हाक माझ्या कानावर आली. अरे शरद... तिकडे बाहेर काय करतो आहेस...?? ये... इकडं आत ये बरं..! तसा मी लगेचच आत गेलो.
हॉलमध्ये एक जुनाट टिव्ही, पाच-सात प्लास्टीक खुर्च्या, त्यावर टीचभर धुळ पडलेली भरपूर मराठी मासिकं, एक शिलाई मशीन, कोपऱ्यात दोन-तीन झाडू वगैरे भरपूर काही दिसत होतं. एक भलीमोठी चांगल्या अवस्थेतील तिजोरी पाठमोरी का ठेवली होती कुणास ठाऊक.? मी नकळत पाठीमागे हात घालून, त्या तिजोरीचा आरसा तपासला, तर तो ही मला चांगल्या अवस्थेत जाणवला. 
भिंती ओबडधोबड दिसत होत्या. ब-याच ठिकाणी ओल ही धरलेली दिसत होती. सगळीकडे एकसारखा पांढरट रंग दिलेला होता. काही ठिकाणी भिंतीला पडलेल्या भेगा बुजवल्यांच स्पष्ट दिसून येत होतं. का कुणास ठाऊक पण घराची अवस्था पाहून मनात विचार येऊन जात होता की, इथं काहीतरी दुरूस्ती वा रिनोवेशनचं काम सुरू होतं, पण ते अर्धवट सोडून दिलं.
हॉल ओलांडून बेडरूममध्ये गेलो, तर तिथंही तीच अवस्था. तिथं भिंतीत काढलेल्या एका कपाटावर ठेवलेली एक खोबरेल तेलाची निळी बाटली, एक कंगवा, काही चाफे आणि रबरा, टिकलीची डबी आणि सिंदूराची एक छोटीशी लांबट डबीही दिसत होती. त्यावर सुद्धा धुळीनं मायेचं पांघरूण घातलेलं दिसत होतं. बेडच्या अगदी समोरच्या भिंतीवर टांगलेली मोरपीस बाकी मनाला खूप सुखावून जात होती.
शेवटी किचनमध्ये आलो. एव्हाना त्यानं दुधाची एक मापाची पिशवी आणि कॉफीच्या दोन छोट्या पुड्या आणून दुध गरम करायला ठेवलं होतं. माझी नजर अजूनही तशीच सैरभैर फिरत होती. जेव्हा कधी अधेमध्ये त्याच्या घरी येतो, तेव्हा माझं हे असंच होतं. त्याच्याशी नेमकं काय बोलावं, ते काहीच सुचत नाही. 
किचनमध्ये निवडक डबे आणि काही भांडी होती. सहजच किचन कट्टयाच्या डाव्या बाजूला असलेल्या देवघराकडे नजर गेली. संपुर्ण देवघर मला रिकामं दिसलं. तिथंही भरपूर धूळ. तिथं अगरबत्ती स्टॅंडमध्ये अगरबत्ती जळून शिल्लक राहिलेली एक काडी दिसत होती. ती कधीची होती कुणास ठाऊक, पण ती काडी साक्ष देत उभी होती की, कधीतरी इथे देव होते. 
त्यानं कॉफीची वाटी देण्यासाठी मला हाक दिली, तेव्हा मी भानावर आलो. मग तो ही माझ्या समोरच मांडी घालून बसला. अजूनही मी आजूबाजूला पाहण्यातच हरवलो होतो. तेव्हा सहज वाटून गेलं की, हा घरात असताना जिथं जिथं फिरतो, तेवढीच त्याचे पाय पडलेली जागा स्वच्छ दिसते आहे, नाहीतर सगळीकडे फक्त धूळ, धूळ आणि धूळच.! मी त्याला काही विचारणार तितक्यात तो म्हणाला की, कामावरून आलो की जाम कंटाळा आलेला असतो रे, त्यामुळे मी आठवड्यातून एकदाच साफसफाई करतो. घरी माझ्याशिवाय कुणी येत जात नाही, त्यामुळे माझं असं अडगळीत राहणं खपून जातं. त्यावर मी त्याला म्हणालो की, असा राहत जावू नकोस रे. आधी सारखा रहा ना.., एकदम टिपटॉप.! त्यावर तो काहीच बोलला नाही, आणि त्याची काळीपांढरी दाढी खाजवत जोरजोरात हसू लागला. तेव्हा क्षणभरासाठी घराच्या भिंती कौतुकाने आमच्याकडे पाहत असल्याचा मला भास झाला. 
मी याच्या घरी का आलो होतो,? नेहमी का येतो,? मी आलो तेव्हा मला काय काय बोलायचं होतं.? त्यापैकी मी त्याच्याशी काही बोललो काय.? अशा एक ना अनेक ढीगभर प्रश्र्नांचा पसारा मनात साठवून मी जड अंतःकरणाने तिथून निघून आलो. नेहमीसारखच अगदी प्रसन्न हस-या चेह-याने त्याने मला निरोप दिला, आणि मी काही पावलं पुढे येतो न येतो तितक्यात मला त्याच्या घराचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकू आला. तिथं बाजूलाच अडगळीत उगवलेली सदाफुली अजूनही मिश्कीलपणे हसत असल्याचा मला भास होत होता.🎭
#आयुष्य_वगैरे 
#अडगळ 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..